नमस्कार! आज अक्षय्य तृतीया. कुठलंही अगदी अशक्यप्राय वाटणारं काम म्हणे या मुहूर्तावर सुरु केलं तर ते पूर्ण होण्याची शक्यता तरी निदान संभवते. म्हणूनच कदाचित गेल्या वर्षी हा मुहूर्त साधला गेला असावा आणि माझ्यासारख्या शहरी मुलीला शेती करणं आताशा हळूहळू जमू लागलंय.
उभा महाराष्ट्र दुष्काळाच्या धगीत चटके सोसतोय आणि नेमक्या त्याच अत्यंत तोकड्या पावसाच्या २०१८-१९ साली मी शेती वगैरे करण्याचं हिरवं बिरवं स्वप्न उराशी बाळगून वर्षंभर शेतात टिकाव धरू शकलेय; अडीच एकराचा खरीप पाहिलाय, रब्बीला साडेचार एकरापर्यंत मजल मारली आहे, नांगरणी, खरिपाची पाळी निगुतीनं वावरात उभं राहून करायला शिकलेय, खुरपणीची मजा श्रावण सरी अंगावर घेत चाखली आहे, हा हा म्हणता १० पिकं लागवडीपासून काढणी पर्यंत कडेला नेली आहेत, पारंपरिक पिकांसोबत शेवग्यासारख्या नव्या नगदी प्रयोगाची जोखीम उचलली आहे, ज्वालामुखीलाच आता छिद्र पडेल की काय अशा भयंकर खोलीवर म्हणजे ४२७ फुटावर पाणी पाणी तडफडत बोअर घ्यायचा उपदव्यापही करून बसलेय, त्याला पाणी लागायची शक्यता आहे येत्या पावसाळ्यात पण म्हणजे वर मांडलेला लेखाजोगा, हा सारा हिरवा पसारा फुलवला तो कोरडवाहूतच! बरोबर वाचलंत, काळजीवाहू शेतीचा मस्तवाल प्रकार म्हणजे कोरडवाहू. मी स्वतःला अत्यंत नशीबवान समजते की देवाने मला शेती करण्याची प्रेरणा दिली आणि पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या माझ्या कोरडवाहू वाटांवरून चालण्याचं केवढं तरी बळ दिलं. आज त्याच उमेदीने ब्लॉग च्या माध्यमातून जमेल तसा संवाद साधण्याचा इरादा आहे. नाहीतरी उन्हाळ्याच्या दिवसात रिकामटेकडं बसून मीडियाने माजवलेला दुष्काळ सजवत बसण्यापेक्षा निदान चार हिरव्या आठवणी चघळाव्यात असं वाटतंच की जीवाला!
आजच शेतात जाऊन आलेय. राखेत विझून नुसत्याच खोचलेल्या आगरबत्तीच्या काडया कशा दिसाव्यात तशी झालीये शेवग्याची गत. उगीच कपोलकल्पित कहाण्या छेडून टाळ्या घेण्याची ही युक्ती नाहीये, अनुदान मागण्यासाठी पोटचं पोरगं उघडं करून दाखवण्याची पद्धतही नाहीये, उगीच लेखनात दर्द हवं म्हणून बिनुन उमाळत काढलेला कढ तर अजिब्बात नाहीये. जे आहे आत्ता शेतात तेच सांगतेय. बिनखोट्याचं धादान्त सत्य! यासाठी देखील हे सांगतेय कारण आय टी वालीच्या शेतीची हीदेखील एक अवस्था होऊ शकते याची फारशी कुणाला कल्पनाच नसते. आता वर्ष होत येईल, अनेक मित्र मैत्रिणींशी गप्पा टप्पा होताना माझ्या शेतीचा विषय हमखास निघतो. लागोलाग मोबाईलच्या पेटाऱ्यातून उचकून धान्याचे, शेतावरचे, गावरहाटीतले फोटो खचाखच दाखवले जातात. मग कसं जमवतेस, विकत देशील का धान्य, सेंद्रिय आम्ही किती तरी दिवस शोधतोय, लोकेशन पाठव, आम्हाला पण ने एकदा शेतावर या गोष्टी होतातच. मलाच भारी वाटतं त्यावेळी. पण मग हो, असं आजसारखं फिरून आले शेतावर की समजतं आपण नेमके किती (बिन)पाण्यात आहोत ते! आय टी आज आहे उद्याचं माहीत नाही पण शेतीवर बसलेली आपली दिल्लगी फार फार छान वाटते, एकदम विश्वाच्या अंतापर्यंत अशीच कायम बियम राहावी एवढी प्रगाढ ओढ वाटते.
तर.... जरा आटोपतं बोलायचं झालं तर मी एक नवशेतकरी आहे! कोरडवाहू म्हणजे "गरीब" आलेच. दिलसे आणि उत्साहाने मात्र ओसंडून अगदी आमीर आहे. पेशाने जर्मन भाषेतील तज्ज्ञ आहे, रोज आय टी च्या एसीत बसून जर्मनीभर मनाने देशाटन करून येते आणि शनिवार रविवारी यथाशक्ती शेतावर मनसोक्त भटकते. ज्ञानप्रबोधिनी गुरुकुलचे संस्कार असतील किंवा मातीची हाकच तेवढी दमदार असेल म्हणून "शिक्षणाचा उपयोग मातीशी घट्ट नाळ जोडण्यासाठी झाला पाहीजे" हे पटतं मला. आमची वडिलोपार्जित शेती गेली ३५ वर्षंतरी पडून होती कारण एकतर पाण्याचं दुर्भिक्ष आणि दुसरं म्हणजे "शेती धंद्यात काय भागतंय होय" हा हतबल दृष्टिकोन! कोणा एका व्यक्तीला दोष द्यायचा प्रश्नच नाही, स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश धार्जीण्या राहिलेल्या आपल्या शिक्षणातच ते प्रोटिन्स व्हिटॅमिन्स नव्हते की चार पदव्या पदरात पडल्यानंतर बुकं मिटून कोणी शेतावर मोट धरण्याचा तेजस्वी निर्णय घेऊ शकेल. थोडक्यात हेच की माझ्यासकट घरातले सगळे खूप शिकले म्हणून आमच्या शेतीचं पुरतं वाटोळं होऊन बसलं.
अचानक एका सकाळी खडबडून स्वप्नं पडलं मला शेताचं आणि उठले नि चालायला लागले गावाकडची वाट. माझं गाव म्हणजे साठेक घरांची साडेतीनशे डोक्यांची थापेवाडी नावाची अगदी मराठी पिक्चर मध्ये दाखवतात तशी हुबेहूब एकुटवाणी वाडी. समाधी लागल्यागत निवांत, पावसाळ्यात दृष्ट लागावी एवढी हिरवीगारेगार आणि उन्हाळ्यात कोरडीठाक वैराण! पाबळ या मस्तानी बाईमुळे किंवा विज्ञानाश्रमामुळे माहीत झालेल्या मोठ्या गावापासून ५ किलोमीटर वरची ही वाडी. तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझ्या राहत्या घरापासून ५६ किलोमीटर वर भेटणारं आमचं शेत याच वाडीच्या कुशीत पहुडलंय. एका वर्षभरापूर्वी मला नेमका कुठला बांध आपला आणि कुठली वावरं आपली हे खरंच ठाऊक नव्हतं आणि कालच्या संध्याकाळी मी गावातल्या जुन्या जाणत्या माणसांना हाताशी धरून घरोघर सल्लामसलत करत फिरत होते, पाणलोटाचं, जलसंधारणाचं काम आपण एकजुटीने करूयात हे पटवून सांगत होते. आजवर झालेली नाबार्डची, पर्सिस्टंट फ़ाऊंडेशनची कामं समजून घेत होते. हा एवढा मोठा आयाम बदललाय माझ्या शेतीचा ! नक्की कसा चालू आहे हा प्रवास आणि काय साधायचंय यातून याविषयी लिहीत राहीन इथे. आवडलं तर जरूर वाचा.
माझ्या "मराठी ब्रेथलेस" मध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी अभिवाचनात म्हटलंय तसं,
"...स्वातंत्र्याचा लढा झाला, बापूजी म्हणाले 'खेड्यांकडे चला!'
चला म्हणून तर गेले बापूजी पण फिरकले कोण?"
आत्ता या घडीला एवढंच सांगू शकते की, "होय! मी फिरकू लागलेय खेड्यांकडे आणि जमलं तर तुम्हीदेखील सोबत या!" कारण अपार ऊर्जेचा अदभूत अगम्य स्रोत तिकडे ओतप्रोत भरलाय. मला धन्य वाटतं त्यात न्हाऊन निघायला.
भेटू परत लवकरच याच समेवर,
तोवर धन्यवाद!
खूपच सुंदर. प्राजक्ता यांचा अनुभव त्यांच्या प्रत्येक ओळीतून डोकावतो आहे. शेतीचा सुवर्ण प्रवास. एका सुंदर दृष्टीकोनाची आणि येण्याऱ्या बदलाची सुरुवात केलीत आपण. खूप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाMi pan mhanu shakte ki mi firakle ahe. Ani ji ji madat kivha shram tula amcha kadun milu shaktat te please hakkane magun gheshil
हटवाAtishay sundar lihla ahes Blog. Waiting for the next one Rucha
उत्तर द्याहटवाKhup chan Prajakta. You are born creative and fabulous work you are doing. I wish you good luck to your new farming journey and I am sure success will always behind you. God bless dear
उत्तर द्याहटवा