शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१९

"जीती" : माणुसकी हरवलेली कौमार्यचाचणी


ऑगस्ट महिन्यात एका दुपारी फोन आला की तुमच्या भावावर हल्ला झालाय. परिस्थिती वाईट आहे. तेव्हा रीतसर पोलीस कम्प्लेंट करायला या. गरगरलंच ! सरळ साधा भाऊ माझा, रोहनदादा. ओळख ना पाळख असलेल्या कुणालाही सहज मदत करून आपलंसं करणारा .... आणि अशा अजातशत्रु माणसावर हल्ला ?? हिशोबच लागेना. गेले. संगमनेरजवळच्या एका सरकारी हॉस्पिटलात भरती केलं होतं साहेबांना. साधं क्रिकेट खेळता खेळता बाचाबाची झाली आणि त्यातून प्रकरण हाणामाऱ्यांपर्यंत गेलं होतं म्हणे. चक्रावलेच! पुण्यातली मैदानं काय ओस पडली होती काय तेव्हा हा एवढ्या दूर नगरला गेलाय क्रिकेट खेळायला... सैरभर विचारातच चौकशी सुरु केली. घडलं असं होतं की चित्रपटाच्या विषयाचा अभ्यास पक्का व्हावा या हेतूने माझ्या भावाने नगरमधील भाटवस्तीत मुक्काम ठोकला होता आणि चर्चेदरम्यान काहीतरी वाद झाल्याने जनप्रक्षोभातून घडलेला हा हल्ला होता. चित्रपटाचं माध्यम घेऊन वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घालणे ही त्याची नेहमीची खोड. पण साल २०१९ चालू असताना, स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र भूमीत आजदेखील ज्या विषयांवर बोलायची चोरी आहे असे दडपून गाडून ठेवलेले पापी विषय नेमके आहेत तरी कोणते, तेच मला समजेना. 

पाप बाहेर पडायला बराच वेळ गेला. कारण एकतर पहिलं इथून बाहेर पडा नाहीतर प्रकरण उगीच चिघळेल असा पोलिसांचा सूर होता. कदाचित आणखी खोलात हा विषय नेण्यात त्यांनाच जोखीम वाटतेय की काय अशी शंका मला वाटून गेली. आणि दुसरं म्हणजे माझ्या भावाला मारच इतका बसला होता की पुन्हा त्याला बोलतं व्हायला बरेच कष्ट घ्यावे लागले. यावेळी चीड फक्त स्वत्वाच्या भावनेतून नव्हती पैदा झाली, तर त्याहून कैकपटीने ती चांगलीच डोकं ठणकवून गेली जेव्हा मला वादाचा मुद्दा नीट समजला ! वादाचा मुद्दा हा होता की कंजार भाट समाजाच्या "जीती" नामक अत्यंत क्रूर आणि घृणास्पद प्रथेला समाजासमोर आणण्याचा खटाटोप रोहनने केला होता. परंतु जीती प्रथेविषयी कुठलीही माहिती बाहेर जाता कामा नये या एकाच हट्टाने पछाडलेल्या जमावाने रोहनवर हल्ला केला आणि नको ते आक्रीत घडलं. झालं ते एका अर्थाने बरंच झालं. विषयाचा तळ तरी समजला.

ही "जीती" म्हणजे नेमकं आहे तरी काय? साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर जीती म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्री कंजारभाट समाजातील नवऱ्या मुलाकडून नवऱ्या मुलीची केली जाणारी कौमार्यचाचणी ! लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला फक्त काही तासाभराचा एकान्त सक्तीने दिला जातो. बोहल्यावरून उतरल्यानंतर थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतल्या घेतल्या घाईघाईने एका बंदिस्त खोलीत नवख्या नवऱ्यासमोर नवऱ्या मुलीने ताबडतोब आपली योनीपरीक्षा द्यायची असते. बरं, ही योनीपरीक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष तर किती धेडगुजरा असावा ! स्त्रीयोनीतून रक्तस्त्राव झाला तर आणि तरच ती मुलगी विवाहपूर्व शुद्ध कुमारी मानली जाते, जर तो रक्तस्त्राव नाही झाला तर ''माल खोटा निघाला'' असं काहीसं बोंबलत तो नवरा मुलगा बाहेर येतो. बाहेर तर सगळा आनंदच असतो. घड्याळ लावून वेळ मोजत, दाराला कान लावून मुलीला निकाली काढायची घाई झालेले कंजारभाटांचे खास मानद पंचमंडळ निष्ठेने तिष्ठत उभेच असते. समजा दिलेल्या तुटपुंजा अवधीत नवऱ्या मुलाला काही अडचणी आल्या तर ही थोर पंच मंडळी मुलाला नको नको त्या क्लिप्स दाखवून अधिकच चेतवतात. या मानद मंडळात महिलादेखील असतात. या महिला समागमाला जाणाऱ्या नववधूच्या शरीराची आधी चाचपणी करून मगच तिला त्या रक्तपरीक्षेला धाडतात. मुलीच्या अंगावरचे सगळे दागिने विनातक्रार काढून ठेवले जातात. मुलीचे दोन्ही हात पांढऱ्या रुमालाने बांधले जातात. जेणेकरून एखादे ब्लेड मारून तिने आपला संसार वगैरे टिकवायचा वृथा प्रयत्न चुकूनही करू नये. स्वच्छ पांढऱ्या चादरीवर पडलेले चार लाल थेंब बाहेर बसल्या पंच मंडळाला दाखवले जातात. प्रत्येक स्त्रीच्या शरीराची ठेवण पूर्णतः वेगळी असते आणि त्यामुळे पहिल्या समागमाच्या वेळी काहींना रक्तस्त्राव होऊ शकतो तर काहींना स्त्राव कधी होतच नाही हे साधे शरीरविज्ञानदेखील झुगारून देणारी अत्यतं अमानुष प्रथा म्हणजे जीती ! स्त्रीला "माल " समजणारी क्रौर्याची परिसीमा म्हणजे जीती ! आणि नाहीच बाहेर पडले स्त्रीयोनीतून रक्त तर त्या चार थेंबांसाठी मुलीला चारित्र्यहीन घोषित करून तिचा संसार मोडीत काढणारी भयानक प्रथा म्हणजे जीती !

जीती मध्ये हरलेल्या मुलीला लगेच बाहेरील पंच, सासरकडचे लोक, सोडून देण्याआधी हक्क बिक्क सांगणारा मर्यादा पुरुषोत्तम नवरा हे लग्नघरीच ठेचून काढतात. तिच्या हतबल शरीरावर कसेबसे दोन कपडे असतील तर तिचे नशीब थोर अन्यथा तशीच उघड्या अंगानिशी तिला माहेरच्यांसमोर फेकले जाते. पुन्हा बापाकडून चपलेने मार खाणे आलेच ! याउलट नवऱ्या मुलाला आपले पौरुष सिद्ध करायला जमले नाही तर त्याला ''लंगडा घोडा'' घोषित करून पुढील बोलणीसाठी पुन्हा पंचांना बोलवले जाते. ''खोटा माल'' निघालेल्या मुलीच्या आईवडलांना मात्र लाखोंचा भुर्दंड भरून पोरीचा संसार पदर पसरून परत विकत घ्यावा लागतो.

मी लिहितेय त्यातला शब्द शब्द खराय. स्वतंत्र भारतातल्या स्वतंत्र भूमीवर आजही २०१९ साली मुलींचे चारित्र्य कौमार्यचाचणी वरून पारखणारी ही हिणकस रूढी अस्तित्वात आहे. कितीही नाकारले किंवा कुणी उघड उघड बोलायला धजत नसले तरी भरपूर शिक्षण घेऊन शहरात पाचआकडी पगार कमावणाऱ्या कंजारभाट समाजातील डॉक्टर, इंजियनीअर मुलामुलींचेही जीतीला शरण जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. तुम्ही कुठेही असा, कुठलीही चार बुकं शिकून या, लग्नाच्या वेळी जर तुम्हाला कंजारभाट रूढी मान्य नसतील, थोडक्यात तुम्हाला ''जीती'' मान्य नसेल तर हा समाज तुम्हाला वाळीत टाकतो. मुलीच्या आणि मुलाच्या घरच्यांवर बारकाईने नजर ठेवणारे, त्यांना पदोपदी जाचक नियमांची आठवण करून देणारे "कंजारभाट पंच" नामक एक हुकुमी मंडळच बनवले गेले आहे. या मंडळाच्या अटी तर विशेष कौतुकास पात्र आहेत बघा. कार्यालयात वगैरे लग्न करण्यास या समाजाचा टोकाचा विरोध असतो. आपल्याच डबक्यात आपली बेडकं बरी ! हे पंच अशा आवेशात समाजात वावरत असतात की जणु पृथ्वीच्या अंतापर्यंत कंजारभाटांचं रक्त ते इतर कुठल्याच जातीच्या गुणसूत्रांमध्ये कदापि विरघळू देणार नाहीयेत. कोतेपणाच्या सर्व बेड्या घट्ट आवळून बसलेली ही पंचमंडळी स्वतःच्या तुंबड्या मात्र यथेच्छ भरून घेतात. उदाहरणार्थ लग्नाची बोलणी चालू असताना एकत्रित बैठकीत मुलाच्या आणि मुलीच्या वडलांकडून प्रत्येकी दहा वीस हजार रुपये तर ते सहज उकळतात. पंचांच्या जाचाला घाबरून दिल्या जाणाऱ्या या दक्षिणेला मात्र "खुशी" म्हणायचं बरं का ! त्यानंतर लग्न लागेस्तोवर छोटे मोठे कुठलेही कार्यक्रम असोत पंचांना निमंत्रण द्यावेच लागते. काडीला - बिडीला करत करत त्या त्या वेळीदेखील ही पंचमंडळी "आमच्या कलमाचं काय?" असं म्हणत सहज दोन दोन हजाराचा हप्ता गोळा करून उठतात. पुन्हा लग्नाच्या दिवशी "आमच्या धारेचं काय?" असं म्हणत पूर्वजांच्या नावाने दारूचा अभिषेक करायला भाग पाडतात. आणि लग्नानंतर जीतीच्या निकालासाठी जो काही उत्साह दाखवतात तो तर अफलातूनच !

नवरा नवरी बोहल्यावरून उतरले की ''छेज बसवली'' जाते. म्हणजे या पंच मंडळींसमोर नवऱ्या मुलीच्या आईच्या पाठीवर नवरदेव सात साड्या टाकतो. आणि सर्वांसमक्ष त्या मातेला एक जोरदार लाथ हाणतो. या प्रकाराला ''चुंदडी टाकणे'' म्हणतात. या आणि अशा अनेक जाचक रूढी कसोशीने पाळल्याच गेल्या पाहिजेत यासाठी वेताळासारखे डोक्यावर बसून असते ते सन्माननीय "कंजारभाट पंच" मंडळ! तुमचा विश्वास बसो वा ना बसो या समाजाचे स्वतंत्र असे वेगळे संविधान आहे. तेही चक्क लिखित स्वरूपात ! कुठल्या प्रसंगी कुणी कुणी पंचांना किती रक्कम रोख द्यायलाच हवी वगैरे नियमांनी त्यात रकानेच्या रकाने भरून माहिती आहे. स्वतंत्र भारतात स्वतःची वेगळी घटना लिहिण्याचे आगळेवेगळे ताळतंत्र या समाजाने जोपासले आहे

कुठे चाललो आहोत आपण ? अनेक सुशिक्षित तरुणांनी या प्रथेला कडाडून विरोध चालवलाय पण तरीदेखील बहुतेकांचं मरण अजून ते पूर्णतः थांबवू शकले नाहीत. आज शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या आणि जन्माने कंजारभाट असून ''जीती''च्या प्रथेला सर्वतोपरी विरोध करणाऱ्या विवेक आणि प्रियांका तमाचीकर यांनी हळूहळू जनजागृतीस सुरुवात केली आहे. सिद्धांत इंद्रेकर सारखे तरुणदेखील लोकांसमोर मोकळेपणे याविषयी बोलण्याचं धाडस करताहेत. पण ज्यांना या भानगडीत पडायचं नाही त्यांना एकतर गपगुमान हे सारं निभावून तरी न्यावं लागतंय किंवा जातिबाह्य तरी ठरावं लागतंय.

मला हसू याचं येतंय की हाच तो थोर भारतदेश आहे जिथे कुंतीपुत्र कर्णाला, तो जन्माने कानीन आहे हे ठाऊक असतानादेखील, केवळ युद्ध टाळण्याहेतूने स्वतः भगवान श्रीकृष्णांनी साक्षात पांडवांचे  ज्येष्ठपण राज्यासकट देऊ केले होते. कानीन म्हणजे अनौरस पुत्र. स्त्रीच्या विवाहपूर्व संबंधांतून जन्माला आलेली संतती म्हणजे कानीन. थोडक्यात स्त्रीचं मातृत्व हे याच देशात गौरवलं गेलं आहे. मुलगी वयात आली, ऋतुमती झाली की तिचा एकदेखील ऋतुस्राव वाया जाऊ नये, शुद्ध बीजापोटी तेजस्वी बालक जन्माला यावे यासाठी तिच्या धारणक्षमतेचा सर्वार्थाने आदर करणारा हा अनादि आर्यांचा विवेकी देश ! एवढेच काय, कानीन बालकांसह पत्नीचा अग्निसाक्षीने सप्तपदी घेऊन स्वीकार करणाऱ्या प्राचीन राजांचाही हाच देश ! आणि आज त्याच देशात ''जीती''सारख्या लाजिरवाण्या रुढी घट्ट कवटाळल्या जाव्यात, केवढा हा दैवदुर्विलास !

आज  सत्तेचं गणित सांभाळण्यासाठी जातीपातीचं अत्यंत बकाल राजकारण बोकाळलंय. विहिरीतली बेडकं विहिरीतच गंटागळ्या खाऊन मरू लागली आहेत. चार चार पिढ्यात घरातल्या घरातच नाती फिरवून लग्न जुळवल्याने आणि जातींची जळमटं टिकवल्याने गुणसूत्रांची गडबड झालेली तिरळी, दुबळी, लंगडी, अपंग आणि अतिशय तेजोहीन बालकं जन्माला येऊ लागली आहेत. नुसतीच माणसांना पिल्लं होऊ लागली आहेत, त्यांच्या बुद्धीला कुठलीही चमक नाही. दुसरीकडे "तुमच्या देशात माणसं एकमेकांवर थुंकतात का?" असे प्रश्न आपल्या परदेशात स्थिरावलेल्या बांधवांना अभारतीयांकडून विचारले जाताहेत. आणि २०२० कडे वाटचाल करणारा इंडिया मात्र रंगीत डोळ्यांनी महासत्ता की आणखी तसलंच काहीतरी व्हायच्या स्वप्नात मोरपिसासारखा तरंगतो आहे.

माझ्या भावाची खटपट अगदीच वाया गेली असं नाही म्हणता येणार. जमेल तेवढं फुटेज मोठ्या खुबीने मिळवून "जीती" नावानेच त्याने नुकताच या विषयावर लघुचित्रपट प्रदर्शित केलाय. स्वतः कथा लिहून संकलन, दिग्दर्शन करून दुप्पट जिद्दीने प्रदर्शित केलाय. मयूर धनवाणी आणि अंकुश राठोड यांनी त्यात कॅमेऱ्याची बाजू सांभाळली आहे. संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. प्रियांका रामपुरेंनी मेकअपची, दत्तात्रय नानावरे, गणेश पवार यांनी निर्मीतीव्यवस्थेची, राजीव मेहतांनी पोस्टर डिझायनींगची धुरा सांभाळली आहे. कोमल शेटे, अनिकेत गणेशकर, मोनिका चौगुले, दादा शेख या गुणी कलाकारांनीं फिल्मला पूर्णत्वाकडे नेले आहे. इंग्रजी सबटायटलींग मी केले आहे. खरे लोकेशन्स, अजिबात अभिनित केलेले खरे प्रसंग, ऑडिशन वगैरे देता गोष्ट मांडणारी जीवंत पात्र पडद्यावर थेट पाहायची इच्छा असेल तर खालील लिंकवर नक्की जा.

Teaser is available on : https://youtu.be/EQyg2HoV5eI

आनंदाची बाब म्हणजे यंदाच्या नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये या फिल्मची बरीच चर्चा झाली आणि इतरही अनेक सोहळ्यांमध्ये वर्णी लागायच्या ती वाटेवर आहे. वरील लेखाजोगा वाचून "जीती" विषयी माझ्या भावाशी म्हणजेच दिग्दर्शक रोहन सदाशिव शिंगाडे यांच्याशी संपर्क साधायचा असल्यास हा क्रमांक फिरवा : ९८९०५७५४२३

भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच ''सती'ची प्रथा बंद झाली होती. २०२० कडे 4Gच्या स्पीडने धावणाऱ्या इंडियात मात्र ''जीती''ची प्रथा बंद करण्यासाठी पुढचे एखादे राजा राममोहन रॉयच जन्माला यायला हवेत काय ?? 
..बाकी सुन्न मनाने येथेच थांबते ..




२ टिप्पण्या:

  1. कंजारभट समाजातल्या या प्रथेचा नुसता निषेध करणं कामाचं नाही. ह्या समुदयामध्ये आज ही शिक्षणाचं त्या मानाने स्त्री शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. शिवाय इको सिस्टीम मधले बरेच घटक आजही अशा प्रथांना खतपाणी घालणारेच आहेत. त्यांचं कशाला, तुझ्या माझ्या सो कॉल्ड सुशिक्षित समाजात देखील 'हायमन फाटून रक्त स्त्राव व्हायलाच हवा' अशीच अपेक्षा असते प्रत्येक मुलाची. प्रश्न पडतो, की खरंच शिकलोय का आपण? की फक्त डिग्र्या मिळवल्या.

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार..

    काल “जीती” या नावाची आमची शॉर्ट फिल्म युट्युबवर प्रदर्शित झाली, मुळात ही शॉर्ट फिल्म नसून एक सामाजिक चळवळ आहे, कंजारभाट समाजामध्ये कोमार्यचाचणी या प्रथेला “जीती” असं संबोधले जाते, बऱ्याच लोकांपर्यंत पोचली आणि मला अपेक्षितपणे बऱ्याच लोकांचे मेसेज आणि फोन आले, माझे व आमच्या टीमचे अभिनंदन केले.
    पण गेली बारा तास मी झोपलो नाही कारण मला कंजारभाट समाजातील काही पंच म्हणून काम करत असणाऱ्या लोकांनी आमच्या समाजातील “जीती” कोमार्यचाचणी ही प्रथा मांडण्याचा अधिकार कोणी दिला असे धमकीचे फोन येत आहेत, मी दोन ते अडीच वर्षं “जीती” कोमार्यचाचणी यावर अभ्यास करत होतो, त्यानंतर मला हा पूर्ण विषय समजला, यापूर्वीही माझ्यावरती हल्ला करण्यात आला होता तसेच मला धमकीचे फोन येत होते, पण मी त्यांना कुठेही न घाबरता त्यांना सामोरे गेलो, पण कालपासून मी हतबल झालो आहे मला खूप फोन आणि मेसेजेस मधुन धमकी येत आहेत,
    माझी फॅमिली खूप घाबरली आहे पण मी घाबरलो नाही, हा सर्वप्रकार मी माझ्या वकिलाशी बोलून त्या लोकांवर योग्य ती कारवाई करणार आहे, अश्या धमकीला मी घाबरत नाही, ही एक सामाजिक चळवळ आहे, महिलांवर होणारे अत्याचार या माध्यमातून कदाचित कमी करण्याचे काम माझ्या व शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून जर होत असेल तर हे साधन नक्कीच महिला सबलीकरणासाठी उपयुक्त ठरेल. एकविसाव्या शतकामध्ये आपण वावरत आहोत आणि अशा प्रथा अजून पण आपल्या अवतीभोवती अस्तित्वात आहेत, अहमदनगर, संगमनेर, कर्नाटक, पुणे, पिंपरी-चिंचवड, येरवडा, राजस्थान, सोलापूर, सांगलीच्या कंजारभाट समाजातील पंचांनी मला धमकीचे फोन केले आहेत, मी कुठेही न घाबरता त्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला आहे पण मला वाटत नाही ते समजुन घेतील, कारण ते समजण्याच्या पलीकडील लोक आहेत, मी निर्णय घेतला आहे या लोकांची पोलीस तक्रार करणार आहे...

    धन्यवाद

    आपलाच,
    रोहन सदाशिव शिंगाडे
    “जीती” या शॉर्ट फिल्मचा,
    लेखक दिग्दर्शक निर्माता.
    Dhruvi Films Pune

    https://youtu.be/i9CJ_AvE3RQ

    उत्तर द्याहटवा

फॉलोअर

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत...