बुधवार, ८ जानेवारी, २०२५

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत एकदम मस्त जगायचं असेल तर भटकंतीचा छंद जीवाला लावून घ्यायलाच हवा. त्याचाच पुढचा भाग म्हणजे झटपट बॅग भरून एका तासात वगैरे वाट्टेल त्या ठिकाणी जाण्यासाठी इंस्टंट रेडी होता यायला हवं. आता ही दोन्ही तत्व पुरेपूर अंगी बाणवून घेतल्यामुळेच की काय पण परवा अचानक ठरलेला वासोटा ट्रेक सुखरूप संपूर्ण करू शकले, त्याचाच हा वृत्तांत!

मुंबईत राहणाऱ्या माझ्या मामे भावंडांचा ट्रेकला जायचा प्लॅन रातोरात ठरत होता. माझे दाजू दोनच आठवड्यांपूर्वी वासोट्याला जाऊन आले होते. त्यामुळे वाटाड्या हाताशी आहे म्हणताच फार पुढचा मागचा विचार न करता सगळ्या गँगने उड्या मारत प्लॅन पक्का ठरवला. वीस सीटर प्रायव्हेट टेम्पो ट्रॅव्हलर बस ठरवली गेली. व्हिडिओ कॉल, व्हॉट्स अप ग्रुप्स सगळं जोरदार जमून आलं. काय काळजी घ्यावी कुणी किती खाऊ आणावा, राहायचं कुठल्या हॉटेलात हे सगळं परस्पर ठरलं. दाजू ऍडमिन झाले, मोहनदादा खजिनदार झाला आणि पटापट गुगल पे भरून पैसे जमा झाले. मुंबईतून रात्री अकरा वाजता कामोठ्याहून बस निघणार आणि पुण्यामार्गे  पहाटे चार पर्यंत साताऱ्याला कासगावापर्यंत जाऊन पोहोचणार हेही ठरलं. मध्येच माझ्या बहिणीला सुचलं की गाडी पुण्याहून जातेय तर प्राजूला नेऊयात का सोबत? वीस माणसांच्या गाडीत पंधराच लोक जमलेत; तर चला अजून एक सीट होईल ऍडजस्ट म्हणत माझ्यापर्यंत प्रोपोजल येऊन पोहोचलं. अक्षरशः तासाभरात बॅग भरून मी झोपी गेले. कारण गाडी मध्यरात्री पुण्याला पोहोचून मला पुढे घेऊन जाणार होती.

वासोट्याविषयी त्यापूर्वी मी फार काही ऐकलं नव्हतं. माझे दाजू जाऊन आले होते आणि अतिशय उत्साहात त्यांनी मला सांगितलं होतं की, असं वाटतंच नाही की आपण इंडियात आहोत एवढा वेगळाच शांत सुंदर आणि निसर्गसंपन्न परिसर आहे तो. अर्थातच भारत वेगळा, इंडिया वेगळा. मी होकार देऊन बॅग भरून झोपी गेले. उद्याचा ट्रेक नेमक्या केवढ्या दुर्गम भागात असेल याची मला अजिबात रेंज नव्हती. जाग आली तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. बारा ते चार अशी जेमतेम चार तासाची झोप झाली होती. इतरांची तर तेवढीही झाली नव्हती कारण निघतानाच गाडीत बिघाड झाल्याने दुसरी गाडी बदलून घ्यावी लागली होती. पुण्याहून पहाटे साडे तीन तासात आम्ही सातारामार्गे कास पठारावर पोहोचलो.

फुलांच्या बहराचा हंगाम नसल्याने नुसतीच पिवळी कुसं अंगावर लपेटून कास पठार डोलत होतं. त्या पिवळ्या सोन्याला झिलई देणारं उगवतीचं धम्म बिंब खरोखरीच फोटोजेनिक भासत होतं. बसने जसजशी दरीत उतरणारी वळणं घेतली तसतशी उसळणाऱ्या प्रसन्न वाऱ्यावर सजलेली हिरवी रानं खुणावू लागली. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला सातारा आम्हाला त्याच्या राखीव जावळीच्या खोऱ्यात वेलकम करत होता.

जावळीचं खोरं! बरोबर……! शिवरायांच्या इतिहासात ज्याचा उल्लेख आढळतो ते हेच जावळीच्या लढाईतलं खोरं. वासोट्याच्या इतिहासाविषयी मी फार काही नव्याने लिहिण्यापेक्षा विकी कोट्स देऊ इच्छिते –

              वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाले असावे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.

वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईतसुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही.

अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा --

श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;

तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा.

 

…. तर अशा या वासोट्याच्या ट्रेकविषयी पुढे सांगते. कास व्हिलेज रिसॉर्ट या साध्या परंतु स्वच्छ अशा हॉटेलात आमची मुक्कामाची व्यवस्था झाली होती. अर्थातच ऍडमिन दाजू, त्यामुळे नियोजन परफेक्ट होतं. नाश्ता गरम पाणी, जेवण आधी सांगून ठेवलं असल्याने वेळेत ट्रेकला निघणं शक्य झालं. खरंतर वासोटा चढायचा तर तांबडं फुटल्या फुटल्या सकाळच्या प्रसन्न ताज्या हवेतच चढायला सुरुवात करायला हवी. आम्हाला मात्र बसच्या बिघाडाने तीन तास उशीर झाला होता. आता प्रचंड ऊन लागणार वगैरे कल्पनेत आम्ही सन स्क्रीन चोपडून निघालो हे वेगळं सांगायला नकोच. मात्र कल्पनेहून सत्य अधिक सुंदर असतं याचा प्रत्यय पुढे लगेच आला.

कोयनेच्या बॅकवॉटरवर बांधलेल्या अथांग शिवसागर तलावाच्या काठावर बोट लागली होती. आमच्या हॉटेलवाल्या दादांनीच आमच्यासाठी बोटीचं बुकिंग करून ठेवलं होतं. जंगलात प्रवेश करण्यासाठी वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. हे काम हॉटेलच्या ओळखीनेच शक्य झालं असावं. पाठीवर चविष्ट भाजीपोळी बांधून द्यायचं पुण्यदेखील त्यांनी साधलं होतं. अन्यथा दुर्गम चढाईने तरी नाहीतर भुकेने तरी जीव व्याकूळ झाला असता. खरंतर वासोट्याआधी बोललं पाहिजे ते त्याच्या पायथ्याशी अस्ताव्यस्त पसरलेल्या अथांग शिवसागर डॅमविषयी.

दुथडी भरून वाहणाऱ्या कोयनेच्या प्रवाहाला आडवून जावळीच्या घनगर्द जंगलात वासोट्याभोवती जो अविश्वसनीय निळ्या पाण्याचा ऐसपैस सागरवजा जलाशय निर्माण झाला आहे त्याला असं शब्दात बांधणं केवळ अशक्य. शिवरायांच्या दूरदृष्टीचा नुसता अंदाज घ्यायचा असेल तरी वासोटा उदाहरणादाखल लक्षात घ्यायला हरकत नाही. वासोटा हा महाराजांचा लाडका किल्ला नव्हताच मुळी. जावळीचं प्रचंड दुर्गम खोरं जिंकून घेतल्यानंतरदेखील महाराजांना वासोटा लगेच आपल्या ताब्यात घ्यावासा वाटला नव्हता. त्याचं कारण म्हणजे त्याची दुर्गमता. वासोट्याचा दैनंदिन बैठकीसाठी किंवा दारुगोळा साठवणुकीसाठी एवढंच काय तर टेहळणीसाठीदेखील उपयोग करून घेणं राजांना सोयीचं वाटत नव्हतं. योग्य वस्तू अथवा व्यक्तीचा योग्य वेळीच योग्य ठिकाणी वापर करवून घेता येणं हे तर शिवरायांच्या मुत्सुद्दी कारभाराचं वैशिष्टय होतं. वासोटा त्यांनी हेरून तर ठेवला होता परंतु ताब्यात घेण्यास महाराज दिरंगाई करत होते ते त्याचमुळे. ताब्यात घेतला तर त्याचा योग्य वापर तर व्हायला हवा ना. वासोटा महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला तो दिनांक ६ जून १६६० रोजी. महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला ताब्यात घेतल्याची नोंद आहे. शत्रूला चोहीकडून वेढून कैदेत ठेवायचं असेल तर दुर्गतम रत्न वासोटा हाती असलाच पाहिजे ही तेव्हा त्यांना सुचलेली कल्पना. वासोट्याला पोहोचायचं तर आधी कोयनेच्या प्रचंड जलप्रवाहातून जावळीच्या खोऱ्यात उतरावं लागतं. जावळीच्या जंगलात आजदेखील भर दुपारी वाघाची डरकाळी ऐकू येते, अस्वलाची चोहीकडे पावलं दिसतात तर शिवकालात कशी असेल परिस्थिती याची कल्पना येऊच शकते.

लाटांवर विहरणाऱ्या स्वछ निळ्या पाण्यातून मोटर बोटीने वासोट्याकडे जायला लागतो तो तब्ब्ल एक तास. बामणोलीच्या काठावरून बोट घेतली तर पंधरा सोळा माणसं सहज मावतील अशी मध्यम आकाराची बोट चक्क एक तासभर धावते तेव्हा कुठे ती जावळीच्या जंगलात वासोट्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोचते. वारा कापत जाणारी शांत निळ्या पाण्यावरची एकुटवाणी होडी चहूबाजूंनी घनगर्द झाडीने नटलेल्या वनगर्द डोंगराईचं आणि छातीत धडकी भरवणाऱ्या जावळीच्या निबीड आरण्याचं दर्शन घडवते. डिझेलचा धूर उडवत जाण्याऐवजी होडी वलहवत का नाही आपण प्रवास करत अशीही चक्रम कल्पना डोक्यात आल्याशिवाय राहात नाही. कारण तो परिसर आहेच तेवढा निसर्गसंपूर्ण. निसर्गसंपन्न नाही उरलीयेत ती आपली शहरी डोकी. नॅचरल एसी आहे त्या खोऱ्यात. सकाळच्या दहा वाजता देखील पहाटेच्या गार वाऱ्याचा शहारा अंगावर जाणवावा एवढा शीतल वारा आहे तिथे.

घड्याळी एक तास घेऊन जेव्हा आमची बोट काठाला लागली तेव्हा समोर वासोटा किल्ला परिसराची वनखात्याची कमान दिसली. प्रवेश करताना आय डी प्रूफची नोंद द्यावीच लागते. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही की, वर गडावर जाण्यापूर्वीच खाली आपल्या सामानाची कसून चौकशी केली जाते. जितक्या प्लॅस्टिक बाटल्या, चॉकलेट्स, बिस्किट्स यांचे रॅपर्स त्या सगळ्या सगळ्या अविघटनशील सामानाची एक भली मोट्ठी लिस्ट वनखात्याचे कर्मचारी बनवतात. आपल्याला तो आकडा सांगितला जातो. आमच्या सोळा जणांच्या ग्रुपकडे मिळून तब्बल एकोणसत्तर प्लॅस्टिक जिन्नस निघाले. ते सगळे घेऊन आपल्याला खुशाल चढाईसाठी वर सोडलं जातं. मात्र पाचशे रुपये डिपॉझिट त्यापूर्वी जमा करून घेतलं जातं. खाली येताना जर आपण एक बाटली किंवा एखादं चॉकलेट रॅपर जरी गडावर कचरा करून टाकून आलो असलो तर मात्र प्रत्येक जिन्नसामागे पाचशे रुपये दंड भरावाच लागतो. आहे की नाही कमाल! ही अशी प्लॅस्टिकमुक्तीची मोहीम खरंतर संपूर्ण देशातल्या सगळ्या किल्ल्यांवर सुरु करायला हवी असं मनापासून वाटलं.

जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत आम्ही चढाईला सुरुवात केली तेव्हा पावणे अकरा वाजले होते. सनस्क्रीनसुद्धा आता वाचवू शकेल की नाही अशी शंका येण्याइतपत ट्रेकिंगसाठीची ही चुकीची वेळ होती. मात्र जस जसं जंगलात प्रवेश करते झालो तसतसं डोक्यावरचं झाडांचं गर्द हिरवं छप्पर अधिकच दाट होत गेलं. एवढं एवढं घट्ट जाळीचं सावली भरून राहिलेलं जंगल की साधा घामसुद्धा फुटत नाही तिथे सहजासहजी. पहिला पायऱ्यांच्या वाटेचा साधा टप्पा पंधरा मिनिटात पार झाला असेल. तोवर सेल्फी गप्पा यांचा सुकाळ सुरु होता; मात्र जस जसे दगड गोट्यांनी भरलेले झऱ्यांचे मार्ग पायाखाली आले तसतसे सगळे मोबाईल आपोपाप पाठीवरच्या सॅकमध्ये गेले आणि सापडतील त्या काठ्यांनी हातात त्यांची जागा घेतली. वासोट्याच्या पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचं गाव होतं म्हणे; त्याचे भग्न अवशेष अजूनही दिसतात. या अवशेषांच्या जवळूनच वासोट्यावर जाण्यासाठी ट्रेकर्सची पायवाट आहे. या वाटेने काही अंतर गेल्यावर ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती दिसते. तिथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होतं. ओढ्याचं पाणी स्वच्छ थंडगार आहे मात्र पोटाची काळजी घेताना ते केवळ हात पाय धुण्यासाठी वापरलेलंच बरं.

चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदं आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वलं प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणं सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं असं आम्हाला बामणोलीत स्थानिक लोकदेखील सांगत होते. 

मित्रांनो, वासोट्याचा ट्रेक हा अजिबात कपल ट्रेक नाही. जोडीने, नुसत्या एका दोघांनी मनात आलं म्हणून पहिल्यांदा अति उत्साहात करायचादेखील हा ट्रेक नाही. या ट्रेकसाठी किमान सहा आठ लोकांचा ग्रुप हवा. कारण जंगलात अस्वलं दर्शन देतात. अनेक चढणं अशी आहेत की ज्यात रडू येईल एवढी निमूळती वळणं आहेत. पाठीवर पाण्याच्या दोन छोट्या बाटल्या, संत्री आणि एखादा भाजी पोळीचा डबा सोबत घेतला तरी या एक दीड किलोच्या वजनाने देखील चढावर पुरती दमछाक होऊन जाते. मी गेली पंधरा वर्ष सहज कुठले ना कुठले ट्रेक करतेय तरी नक्की सांगेन की हा ट्रेक गृहीत धरावा एवढा सोपा नव्हता. आमच्याच ग्रुपमधल्या आमच्या दोन वहिन्यांचे एकेक हात वासोट्यावरून उतरताना पडून फ्रॅक्चर झालेत. त्यामुळे ही अजिबात अतिशयोक्ती नाही. शरीराचा तोल साधता येत असेल आणि चढाईची, उतरण्याची पुरेपूर तयारी असेल, अंगात भरपूर स्टॅमिना असेल तर आणि तरच वासोट्याला जा. अजून एक, वासोटा हा एकवेळ लहान मुलांसाठी करण्यासाठी पहिलाच ट्रेक म्हणून उत्तम ठरतही असेल परंतु असे प्रौढ की ज्यांना रोज भरपूर चालण्याची सवय नाही आणि आयुष्यात पहिल्यांदाच ट्रेकिंगला जायची इच्छा आहे त्यांनी चुकूनही लगेच उठून वासोट्याच्या वाटेला जाऊ नये. अर्थात, एवढा डिस्क्लेमर देण्यामागे एकमेव कारण हे आहे की सगळ्यांनी जीव सांभाळून सुखरूप हा ट्रेक पूर्ण करावा, एवढीच इच्छा. बाकी पट्टीच्या ट्रेकर्सने चुकवू नये असाच आहे वासोटा. आमच्या ग्रुपमध्ये राज्ञी, अर्पित आणि अपूर्व हे सहा ते नऊ वयाचे तीन लहान ट्रेकर्स होते. त्यांनी एकदाही आम्हाला उचलून घ्या वगैरे म्हटलं नाही. कारण त्यांच्या मनात भीतीचा लवलेशदेखील नव्हता, अंगात तुडतुडा उत्साह ठासून भरलेला होता, भरीस भर जावळीचा बेभान वारा सोबतीला होता आणि थंडगार जंगल तो स्टॅमिना कायम टिकवून ठेवत होतं.

पायात व्यवस्थित स्पोर्ट्सशूज घालून, अंग व्यवस्थित झाकणारे साधे सैल टी शर्ट पॅन्ट असे कपडे घालून मगच या ट्रेकला जायला हवं. सतत धपाक धपाक पडून खरचटण्याचे चान्सेसच जास्त आहेत. ग्रुपने स्वतःसोबत पेन किलर गोळ्या, बँडेज, प्रथमोपचार साधनं, स्प्रे वगैरे देखील ठेवायला हवं. आमच्यातल्या चाळीशीच्या दोन्ही वहिनी जेव्हा हात फ्रॅक्चर झाल्याने व्याकूळ झाल्या होत्या तेव्हा तडक डॉक्टरकडे जावंसं वाटत होतं परंतु जावळीच्या जंगलात डॉक्टर भेटतच नाही. चाळीस किलोमीटर दूर साताऱ्याला जाण्याशिवाय पर्याय नसतो. उशीरा उपचार मिळाल्याने त्यातल्या एकीच्या हातात आता ऑपरेशन करून रॉड टाकावा लागणार आहे. हे असं इथून पुढे कुणाच्याही बाबतीत होऊ नये म्हणूनदेखील हा लेखन प्रपंच!

अर्धा किल्ला चढल्यावर इंग्लिश एस आकाराची दोन दुर्दम्य वळणं लागतात. चढताना ती घाम काढतात आणि उतरताना अक्षरशः तुम्हाला ती ढकलून देतात. हीच वाट पुढे नागेश्वराकडे जाते. नागेश्वर मंदिराची चढण अतिप्रचंड अवघड आहे असं ऐकलं. ती वाट म्हणे केवळ महाशिवरात्रीला उघडी करतात. एरवी ती ट्रेकर्सच्या सुरक्षिततेसाठी बंदच ठेवतात. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचं रान लागतं. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.

गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाला बर्ड्स आय व्ह्यूने पाहता येतं. हिरव्या गालिच्यात अंथरलेलं ते निळं माणिक वाटतं. पाण्यातून वाट काढत येणाऱ्या बोटीतून काही केल्या वासोट्याचा सुळकादेखील दूरवरून का बरं दिसत नव्हता त्याचं तिथे उत्तर मिळतं. दिमाखात फडकणाऱ्या भगव्या झेंड्याखाली उभं राहून फोटू काढावासा वाटतो तेव्हा जाणवतं की या गडावर पोहोचणं इतकं इतकं दुर्लभ आहे की कैदेत टाकलेल्या शत्रूलादेखील  खाली पळून जाणं खरंच मरणप्राय वाटत असावं. वर डांबून ठेवलं तर कैदेत कोंडून तरी मरण येणार आणि खाली पळून जावं तर  जावळीचं भयाण जंगल जीवाचा लचका तोडून खाल्ल्याशिवाय सोडणारच नाही. त्यातूनही बचावलो तरी खालच्या अथांग शिवसागरात बुडून मरण्याची भीती होतीच. शिवरायांच्या महान नेतृत्वाला मनोमन मुजरा केल्याशिवाय फोटू बिटू काढणं खरंच जीवावर येतं. धन्य ते राजे! धन्य तो सह्याद्री!

शिवराय मला कायम अवतारी पुरुष वाटतात त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे त्यांनी पंचमहाभूतांना आवाहन करून स्वराज्याकामी अनुकूल करवून घेतलं होतं. समुद्राच्या मधोमध बांधलेल्या खाऱ्या पाण्याच्या सिंधुदुर्गावर त्यांना जशा गोड्या पाण्याच्या दोन दोन बावी सापडल्या त्याचप्रमाणे इथेही दुर्गम्य अशा या व्याघ्रगडावर म्हणजेच वासोट्यावर अगदी माथ्यावर गोड्या पाण्याच्या दोन टाक्या त्यांच्या हाती लागल्या. पूर्वीच्या काळी पिण्यायोग्य पाणी गडावरच होतं. सध्या मेंटेनन्स अभावी मला तरी ते पिण्यायोग्य जाणवलं नाही.

शिवरायांच्याही आधी म्हणजे अगदी पूर्वी शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने जेव्हा वासोट्यावर थोडं फार बांधकाम केलं असेल तेव्हा एवढ्या तोडी, कातळातून घडवलेले कभिन्न चिरे नेमके वर कसे उचलून नेले असतील की तिथेच कातळ शोधून घडवले असतील हा प्रश्न जाम त्रास देतो. त्याही आधी म्हणजे पृथ्वीवर म्हणे जेव्हा हिमयुग होतं त्यावेळी ज्वालामुखीच्या वर उसळलेल्या लाटा वासोट्याच्या खांद्यावर येऊन थंडावल्या की काय असं वाटावं इतक्या कोरीव डोंगररांगांनी हा व्याघ्रगड वेढला आहे. वरून दिसणारा नजारा ट्रेकर्सला खिळवून ठेवतो हे नक्की.

जेवणावर तुटून पडल्यानंतर आम्ही वाटेवरच्या मारुतीरायाचं दर्शन घेतलं. मोठ्या वाड्याचे अवशेष बघताना हेही ऐकायला मिळालं की म्हणे इंग्रजांनी तोफा डागून वासोट्याची जमेल तेवढी पडझड करण्यात अजिबात कसर सोडली नव्हती. गड उतरायला सुरुवात करण्यापूर्वी उत्तरेकडच्या एको पॉईंटवर पाय खरडत गेलो. पाय एव्हाना एवढे बोलू लागले होते की फूटभरसुद्धा जास्त चालायची इच्छा उरली नव्हती.

एको पॉईंट मात्र आमचीच वाट पहात होता. कुठल्याही तटबंदीशिवाय भणाण वाऱ्यावर दिमाखात उभी असलेली ही माची तुमचा घसा फोडते. मोठ्या ग्रुपने जर तुम्ही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केलात तर केवळ तीन सेकंदांच्या फरकाने तुम्हाला प्रचंड कंपनांमधून अति सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकू येतो, तोही जसाच्या तसा. जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेव म्हणत आम्ही सोळाही जण जीव तोडून घसा फोडून एवढे एवढे मजा लुटत होतो की तिथेच उभं राहून आयुष्यभर महाराजांचं नाव घेत राहावं असं वाटून गेलं. एको पॉईंटची मजा चाखण्यासाठी छातीत दम साठवून वासोटा चढून पाहावाच एकदा.

गड उतरताना आम्ही पुरेपूर काळजी घेत होतो. मोबाईलला कास पठारापासून नसलेली रेंज अचानक वरच्या सुळक्यावर मिळाल्याने लक्ष विचलित झालं असावं. खरंतर तेही खास कारण नव्हतं, उतारच एवढा तीव्र होता की दोघीजणी पायाखालच्या गोल छोट्या दगडांवरून गडगडत पडल्या. कितीही काळजी घेतली तरी असे उतार नाकी नऊ सोडतात हेच खरं. एकमेकांच्या आधाराने आम्ही सगळ्यात वरच्या टोकाची महाकठीण इंग्लिश एस ची वळणं पार करत खाली आलो. येताना वाट चुकतेय की काय असं वाटावं एवढी न संपणारी लांबच लांब मार्गिका आहे ती. खाली पायऱ्यांना येऊन लागलो तरी गड संपत नाही. हातातलं स्मार्टवॉच सतत अभिनंदनाचे व्हयब्रेटर वाजवू लागलं होतं. जाऊन येऊन खरंतर दमून चढून उतरून एकूण साडे आठ किलोमीटरचा ट्रेक आहे वासोट्याचा.

संध्याकाळी साडेचारलाच किर्रर्र अंधार पडतो या गडावर, कारण सावल्यांनी सूर्य दिसतच नाही कधी. जंगलच तेवढं घट्ट आहे. पाचला आम्ही परतीच्या बोटीत बसलो आणि बामणोलीत मावळत्या सूर्याला न्याहाळत ठार अंधारात येऊन सव्वा सहाला पोहोचलो. साध्या बोटीला हेडलाईट वगैरे काहीच नसतो त्यामुळे चार वाजताच वासोट्यावर वनखात्याचे कर्मचारी शिट्ट्या वाजवून ट्रेकर्सला खाली पाठवून देतात. बामणोलीत आल्याशिवाय चहा मॅगी काहीच मिळू शकत नाही. काठावरचा नारायण महाराजांचा भुयारी मठ चुकवू नये एवढा शांत गंभीर आणि पवित्र आहे.

सातच्या अंधारात आमच्या बस ड्रायव्हर दादांनी आम्हाला शिताफीने कास व्हिलेज रिसॉर्टमध्ये आणून सोडलं. शेकोटीच्या ऊबेत डोक्यावर पसरलेल्या लख्ख चांदण्यांच्या साक्षीने रात्र चढत गेली. शेजारी सांडलेल्या शिवसागर जलाशयाच्या थंड लाटांनी थंडी पहाटेपर्यंत घेरून बसली होती. दुर्गतम रत्न वासोटा सर करून आल्याचं वेगळंच समाधान उगवतीचा तेजस्वी सूर्य देऊ करत होता. गडावर ऐकलेल्या गोष्टीतली ताई तेलीण नेमकी कोण होती आणि पेशव्यांच्या बापू गोखले या पंतप्रतिनिधीशी आठ महिने झुंजून गड राखू इच्छिणारी ही वाघीण नेमकी किती शूर होती ही वाऱ्यावर विरून गेलेली अनुत्तरित गोष्ट मात्र डोक्यात रुंजी घालत राहिली.

_________________

#wasota #wasotatrek #bhatkanti #travelblog #kaaspathar #sataratrek



























फॉलोअर

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत...