३१ डिसेंबर २०२०. अर्थातच अविस्मरणीय वर्षाची संध्याकाळ. मी फोन लावत होते. रेंज मिळत नव्हती. अखेर “पूरा देश इस बिमारीसे लढ रहा है” वगैरे शास्त्र उरकून अमिताभजींच्या पल्याड बीप बीप वाजलं ... पण फोन लागूच शकला नाही.
रीवाजाने व्हॉटसअप विंडो > मग आधी मनातलं उमटलं > मग परत खोडलं गेलं! हिला मुलाखत वगैरे दे म्हटलं तर एका नम्र नकारात सगळ्या शक्यता संपुष्टात येतील > मग गुगली सुचली (संपादकीय खुर्चीची कृपा!) > sent > एक टिक > दुसऱ्या दिवशी दोन टिक!
मग नेटवर्क गवसलं पण वेळ अपुरा...
दुसरीकडे ‘स्पंदन’चा पुरा अंक जवळपास तयार झाला होता...
परत वेळ आणि दिवस वेगळा..! कारण ती प्रवासात..
अखेर एका फोनकॉलएवढी निवांती हाती लागली!
पलीकडे फोनवर होती प्रबोधरत्न डॉ. अश्विनी महाजन!.... ती म्हटली, ‘स्टोरी वगैरे नको करू गं. अजून कशातच काही नाही... अजून तर खूप काम करायचंय... तुला काही इंटरेस्टिंग वाटलं तरच छाप’!!
.....
अश्विनीताई, कुठे आहेस सध्या?
अगं, गडचिरोलीत! आणि खूप सॉरी... अचानक प्रवासाचं ठरलं.
सॉरी काय त्यात! नेटवर्कची मात्र खूपच मारामारी दिसतेय!
उलट चांगलंय नेटवर्क आता! आणि इथे शहरी भागात असतं नेटवर्क. पूर्वी एवढंही नव्हतं अगं. इथे आल्यावर इथल्या कलेक्टरच्या मागे लागून लागून फायबर कनेक्टचे बरेच उद्योग केले आणि किमान आमच्या पीएचसीसाठी तरी म्हणजे दवाखान्यांमध्ये तरी नेटवर्क मिळवलं. पण अजूनही जिल्ह्याच्या ५०% हून अधिक भागात नेटवर्क नाहीये.
जंगलात असते का गं रेंज?
नाही. नाही. तिथे अजून शांती अबाधीत आहे. आदिवासी पाड्यांमध्ये गेले की तिकडे नसते रेंज. पण गडचिरोली म्हणजे काय संपूर्ण अरण्यप्रदेश नाही. शहरी भाग झालाय इथेही विकसित. नक्षलवादी जिल्ह्यांत हा प्रदेश मोडतो, त्यामुळे इथल्या विकासाच्या व्याख्या थोड्या वेगळ्या आहेत, एवढं मात्र खरं!
सध्या नेमकं काय काम करतेयस?
सध्या मी UNICEF या जागतिक बालक-आरोग्य संघटनेची District Health and Nutrition Consultant म्हणून काम करते.
वाह! मस्तच! आधी तू ओरिसातल्या ‘स्वास्थ्य स्वराज’ सोबत काम करायचीस ना?
हो. तो एक विलक्षण सुंदर अनुभव होता. खरंतर त्या आधी छत्तीसगढच्या जन स्वास्थ्य सहयोग संस्थेत डॉक्टर म्हणून काम करायचे. गनियारी नावाचा बिलासपूरमधला दुर्गम इलाखा आहे तो! तिथलं कामही मला खूप आवडायचं. शहीद हॉस्पिटलमध्येही काम करण्याची संधी मिळाली त्या दरम्यान! शहीद हे नाव तिथल्या खाण कामगारांनी त्यांच्या बांधवांच्या स्मरणार्थ ठेवलंय. खाण कामगार चळवळीत बरेच जण मारले गेलेत. गरीब आहेत तिथले लोक पण त्यांनी एकत्र येऊन रुग्णालय बांधलंय. मला त्यांच्यासाठी थोडंफार काम करता आलं. डॉ. अभय बंगांच्या ‘सर्च’चं कामही मी जवळून पाहिलंय. पब्लिक हेल्थ हा कायमच माझ्या जिव्हाळ्याचा विषय ठरलाय. ऊर्जा देतो तो मला! इथे आता गडचिरोलीत UNICEF मार्फत मी आरोग्य आणि पोषणविषयक सामाजिक जागृती करण्याचं काम करते.
तेही ऐन कोरोनात?
हो ना! श्रीमंतांनी जगभर विमानाने पसरवलेला हा आजार आमच्या जंगलवाटांपर्यंत येऊन थडकेल असं गेल्या वर्षी यावेळी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तो आलाच! आतल्या आदिवासी पाड्यांबाबत आम्ही थोडे निश्चिंत होतो पण गडचिरोलीतला नागर वस्तीचा जो शहरी भाग आहे ना तिथे खरंच धाकधूक होती. इथे साधा पोलिओचा डोस पोहोचवेपर्यंत किंवा रोजच्या जगण्यातल्या साध्या साध्या स्वच्छतेच्या सवयी समजावून सांगेपर्यंत कधीकधी नाकी नऊ येतं. अगं, डॉक्टरची पायरीच सहसा चढत नाहीत इथले आदिवासी लोक.
काय केलंस नेमकं अशा वेळी?
वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता. पटापट तयारीला लागलो. पहिली गोष्ट ही केली की बाहेरून आलेला प्रत्येक अन् प्रत्येक माणूस आधी चौदा दिवस कॉरन्टाइन होतोय याकडे जातीने लक्ष दिलं. ते का करायचं हे इथल्या जवळपास सगळ्या लोकांना समजावून सांगितलं. इथे डॉक्टरपेक्षाही नर्सेस, आया, अगदी आंगणवाडी सेविका, आशाताई या लोकांना जवळच्या वाटतात. त्या सगळ्या महिलाही लोकांसाठी खरंच खूप मनापासून काम करतात. गव्हर्नमेंट बॉडीची मदत घेतली. किती ऑक्सिजन बेड्स लागतील, कुठे कसे ते उभे करता येतील या कामात मी स्वतःला झोकून दिलं. सुरुवातीला खरंच खूप ताण आला पण लोकांचे जीव अखेरीस संपूर्ण टीमवर्कमुळेच वाचले.
लॉकडाऊनचा परिणाम किती होता?
ते तर काही विचारू नकोस. जगासाठी लॉकडाऊन वेगळा होता, पण इथला लॉकडाऊन सांगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्दच नाहीत. अगं इथलं संपूर्ण जनजीवनच ठप्प झालं अगदी आजपर्यंत आम्ही त्याचे परिणाम भोगतोय. एसटी गाड्यांशिवाय इथे प्रवास होत नाहीत. एवढी वर्ष हातापाया पडून मुलींना शाळेत पाठवा वगैरेसाठी केलेली मेहनत धोक्यात आलीये. इथल्या मुलींचं शाळेत येणं हे फक्त पुस्तकी शिक्षणासाठी नसतं गं. आरोग्याच्या खूप गोष्टी त्याद्वारे आम्ही शिकवतो त्यांना. परवा एक चौदा वर्षांची मुलगी गरोदर असल्याची केस हाताळावी लागलीये. लॉकडाऊन झाला, टाळ्या थाळ्या सगळंच झालं पण इथलं वास्तव कुठल्याही टीव्ही चॅनेलला कधीच कळू शकणार नाही एवढं भयानक होतं. घरी परतणाऱ्या मजूरांचे कमालीचे हाल झाले. इथून हैदराबाद म्हण किंवा आणखीही इतर राज्यांपर्यंत त्यांनी सायकलवर प्रवास केला. कसलं आधारकार्ड आणि कसलं रेल्वे आरक्षण! पुरं जगणंच चाकावर हाकायचं होतं. किमान त्या प्रवासात त्यांची जेवणाची सोय व्हावी यासाठी आम्ही खटपट केली. माझ्या नवऱ्याची या कामी खूप मदत होते. तोही माझ्यासारखाच डॉक्टर आहे, इथला गडचिरोलीचा आहे. आम्ही दोघेही पब्लिक हेल्थ मेडिकल सेक्टरमध्ये काम करतो.
पब्लिक हेल्थ सेक्टरमध्ये यायचं कधी ठरवलंस?
छत्तीसगढ- बिलासपूरमध्ये काम करताना! गनियारी हे खूप छोटसं खेडेगाव आहे तिथे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना मी सर्पदंश झालेले पेशंट्स हाताळलेत. कुपोषणाच्या समस्या तर रोजच असायच्या. तिथे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना आम्ही खूप युक्त्या लढवून बरं करायचो. अत्यंत कमी खर्चात आय सी यु सारखे वॉर्डस उभे करायचो. गावातल्या लोकांना आरोग्याची सेवा देताना माझ्या लक्षात आलं की इथे आरोग्यविषयक भान निर्माण करण्याची खरी गरज आहे. एरवी सर्जन किंवा अमुक तमुक स्पेशालीस्ट डॉक्टर्सविषयी, त्यांच्या शस्त्रक्रियांविषयी पेपरमध्ये छापून येतं. पण सामाजिक आरोग्य क्षेत्रात जनजागृती करणारे डॉक्टर्स मला पडद्यामागचे खरे कलाकार वाटतात. खास करून आदिवासी आणि ग्रामीण भागात तर त्यांचं काम कमालीचं महत्वाचं आहे.
काही दिवसांपूर्वी आनंदवन ढवळून टाकणारी घटना घडली. त्याच भागात तू काम करतेस. तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?
केवळ पहिली प्रतिक्रिया नाही तर कायम मला हे ठामपणे म्हणावसं वाटतं की, सामाजिक सेवांमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीकडे तिचं वलय बाजूला ठेवून, आपण केवळ माणूस म्हणून का नाही पाहू शकत? शीतल आमटेंच्या आत्महत्येविषयी मनापासून वाईट वाटलं. पण एकूणच ज्या पद्धतीने मिडीयाने तो विषय हाताळला, पत्रकं फिरवली गेली ते पाहून खरंतर भीती वाटली, काळजात धस्स झालं! मी आज सामाजिक आरोग्य आणि पोषणाच्या क्षेत्रात काम करते. माझे अनेक मित्र मैत्रिणी स्वतःला झोकून देऊन लोकांसाठी जीवाचं रान करतायत. वलय बाजूला ठेवून आपण सगळ्यांकडे केवळ माणूस म्हणून नाही का बघू शकत?
तू बोलतेयस त्यात तथ्य आहे पण काही उपाय?
प्रत्येकाने फक्त आपलं काम प्रामाणिकपणे केलं तरी बरेच प्रश्न सुटतील असं वाटतं. तुम्ही जेव्हा तुमचं काम नीट करत नाही, किमान प्रोफेशनल एथिक्सदेखील पाळत नाही तेव्हा उगीच तुम्हाला इतरांचं काम वलयांकित वाटू लागतं! वलय आलं की अपेक्षांचं ओझं ओघाने येतंच!
हा झाला तुझा विचार पण रोज काम करताना तुझ्या आजुबाजूला तुला अशी उदाहरणं दिसतात?
हो हो. इथे गडचिरोलीत तर बरीच दिसतात. या भागाने मला खूप ऊर्जा दिली असं म्हणेन. अगदी आशा- आंगणवाडी सेविका असोत किंवा पब्लिक हेल्थ वर्कर्स असोत, कायमच ते त्यांचं त्यांचं काम खूप मनापासून करताना मला जाणवतात. एक छोटा प्रसंग सांगते, एक बाई परवा बाळंत झाली आणि तिच्या तान्हुल्या बाळाला डायरिया झाला. डॉक्टरकडे सहसा जातच नाहीत इथले लोक. ती बाई खूप घाबरली होती. डॉक्टरने खूप समजावलं तिला की दवाखान्यात बाळाला ऍडमिट कर म्हणून, पण तिने काही ऐकलं नाही. शेवटी तो डॉक्टर त्या बाईला आणि बाळाला त्याच्या घरी त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्यासाठी घेऊन गेला आणि ते बाळ वाचवलं. दिसायला छोटी कृती दिसेल ही त्याची, पण खूप काही शिकवून जाते ही गोष्ट मला! ओरिसातदेखील मी आम्हाला मदत करणाऱ्या अशाच ऊर्जादायी बायकांना पाहायचे. घरची सगळी कामं आटोपून, शेतातली कामं उरकून, मग एक आख्खा डोंगर चढून त्या यायच्या मला मदत करायला!
तुझ्या या प्रवासात शाळेचं योगदान किती आहे असं तुला वाटतं?
खूप मोठं योगदान आहे. मी गुरुकुलच्या पहिल्या तुकडीची भाग्यवान विद्यार्थिनी. भाग्यवान यासाठी म्हणेन की, मा. भाऊंचा खूप सहवास त्यावेळी लाभला. ते जिथे कुठे प्रवासाला जायचे तिथेही सोबत घेऊन जायचे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना. सगळ्याच शिक्षकांनी पोटच्या पोरांसारखं प्रेम दिलंय आपल्याला, तुलाही माहितच आहे की! पंचकोशाधारित शिक्षण हा त्यावेळी न समजणारा शब्द होता, पण आज जाणवतंय की किती बारकाईने विचार केला होता त्यांनी शिक्षणाचा! या मुलांना खेळता आलं पाहिजे, यांना कलाविषयांची ओळख करून दिली पाहिजे, यांना समोरच्याला प्रश्न विचारता आले पाहिजेत, यांचं पाठांतर उत्तम हवं, यांना लोकांची दुःख समजून घेता आली पाहिजेत. मातृभूमी परिचय शिबीर हा गुरुकुलात वर्षभराच्या अभ्यासक्रमाचा भाग बनवून भाऊंनी काळाच्या पुढचं शिक्षण निर्माण केलं. मला कायम वाटतं की, ही संवेदना- सहवेदना जर शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात माझ्या शाळेने जाणीवपूर्वक रुजवली नसती तर कदाचित हे सेवाक्षेत्र मला कधीच समजलं नसतं.
मला आठवतंय तू शाळेत असताना कीर्तनदेखील करायचीस!
मजा असते! शाळेत जाऊन फक्त अभ्यास थोडीच असतो करायचा!
सध्या नवीन काय चालू आहे?
लेखन करतेय. दोन तीन वर्षांपूर्वीपासून एक रिसर्च पेपर लिहायचा राहिलाय आणि एका संस्थेसाठी रिव्ह्यू लिहितेय.
‘स्पंदन’साठी सुद्धा वेळोवेळी लिहित जा!
हो हो नक्की! माजी विद्यार्थी संघटनासाठी माझ्या परिने होईल तेवढी मदत मी नक्की करत जाईन.
.....
ती म्हटली होती, तुला काही इंटरेस्टिंग वाटलं तरच छाप’!!
मी माझं काम केलंय. तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा!
- प्राजक्ता गव्हाणे
jpnv.spandan@gmail.com
वरील मुलाखत ही ज्ञान प्रबोधिनीच्या ‘स्पंदन’ या मासिकासाठी घेतली आहे. ‘स्पंदन’ हे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे संवादपत्र होय. संपूर्ण ई-अंक सर्वांसाठी खालील लिंकवर उपलब्ध आहे. ‘शाळा’ नावाचा खास कोपरा ज्या ज्या रसिकमनात राखीव आहे त्या त्या प्रत्येकासाठी खुला आहे हा अंक!