शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

“मी अजूनही अभ्यास करतो...!”- भाऊ

 

ठरल्या वेळेप्रमाणे मी शाळेत पोहोचले. लॉकडाऊनमुळे अंगावर येणारा शुकशुकाट एरवीच्या गोंगाटाची आठवण करून देत होता. गोंगाटच! कारण इथे प्रत्येकाला मत असतं, लहान थोर प्रत्येकजण आपल्या स्वतंत्र बुद्धीने विचार करतो; त्यामुळे त्याला मी मुलांचा निरागस किलबिलाट वगैरे अजिबात म्हणणार नाही. प्रखर विचारांची ही खाण घडवणारे, औद्योगिक नगरीतील या उजाड माळरानावर ३९ वर्षांपूर्वी विद्येचं स्वप्न पाहणारे शांतमूर्ती वामनराव अभ्यंकर म्हणजेच सर्वांचे भाऊ मात्र आपल्या ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणेच कामात व्यग्र होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होण्यापूर्वी ‘चहा मागवतो तुझ्यासाठी’ असं त्यांनी म्हणताच मी फक्त हसले; कारण त्यांनाही समजलं. ही व्यक्ती केवळ संस्कृत शिकवत नाही तर सुभाषित जगते!’ प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्र वदाचरेत । थेट गप्पांना सुरुवात झाली.

 

भाऊ, शाळेत असताना तुम्ही आम्हाला संकल्प करायला सांगायचात. आता आम्ही थोडे मोठे झालोय. आम्ही आता कुठले संकल्प करावेत? जे काही संकल्प सध्या करतोय त्यांची दिशा कशी ठरवावी?

चांगला प्रश्न! खरं पाहता  मनुष्यप्रवाहाच्या ओघात आपण एखाद्या बिंदूपेक्षाही कमी आहोत. प्रवाहातले मागचे बिंदू आपल्याला कायम पुढे ढकलत असतात. त्यामुळे आपण लोकांना पुढे ढकलत गेलं पाहिजे. जातच असतो, काही ना काही कारणाने.. कळत नकळत. आता संकल्प काय करावा? तर तो करताना भूमिका ही अशी असावी की महासागराला मिळेपर्यंत मला माझ्या मूळ उगमाची आठवण ठेवता यायला पाहिजे, आणि महासागराला मिळाल्यानंतर आपण ज्या मूळ उगमापासून निघालो त्याविषयी  कृतज्ञता बाळगली पाहिजे. कारण त्या मूळ उगमाने आपल्याला पुढे ढकलण्याचं काम केलं; मधल्या अनेक लोकांनी पुढे ढकललं. आपणही कोणालातरी पुढे ढकलत असतो, म्हणजे प्रेरणा देत असतो. आपण ज्यांना प्रेरणा देतोय तेदेखील महासागराला मिळतील हे पाहण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे. हे विचाराने करता येईल. कृतीने करता येईल. निर्मितीने करता येईल. ही निर्मिती साहित्यिकच असली पाहिजे असं नाही. वस्तूरूप निर्मितीही करता येईल. परंतु मनुष्यांना किंवा खरंतर या पृथ्वीवरील सर्वांनाच ज्या निर्मितीची आवश्यकता असते ते म्हणजे अन्न. ते अन्न निर्माण करणं, वाटणं आणि ज्यांना हे अन्न निर्माण करण्याची किंवा खाण्याचीदेखील शक्ती नाहीये, त्यांना ती आपली शक्ती देता आली तर देणं यासाठी आपले संकल्प असावेत. आता प्रत्येकाची आवड निवड हाही भाग त्यात अवश्यमेव आहे. म्हणजे काहींना वस्तू उत्पादन करायला आवडतात, काहीना चांगले विचार करावेसे वाटतात, काहींना चांगले विचार अनेकांपर्यंत पोहोचवावेसे वाटतात. लोकांना जगावसं वाटेल आणि ते जगत असताना दुसऱ्यांना जगावसं वाटेल यासाठी आपला संकल्प असावा. मग तो संकल्प मूर्त असेल वा अमूर्त. म्हणजे केशवसूतांपासून अनेक कवी झाले. खरं म्हणजे केशवसूतांनी, सावरकरांनी आणि अन्य अनेकांनी, बंकिमचंद्र चटर्जीसारख्या कादंबरीकारांनी अनेक लोकांना जगायला शिकवलं. जगावसं असं मनुष्याला केव्हापर्यंत वाटतं, ‘माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ आहे’ असं माणसाला जोवर वाटतं तोवर त्याला जगावसं वाटतं. मी आजकाल माझ्या आजुबाजूला अशी अनेक माणसं बघतो की ‘आता हे जीवन ओझं झालंय. तेव्हा पुरे झालं आता’, असा चेहरा करून वावरतात. सुदैवाने मला अजून तरी तसं वाटत नाहीये. त्यामागे शरीरस्वास्थ्य हे कारण असेलही. पण मला कायम असं वाटतं की भगवंताची माझ्यावर कृपा आहे. कारण अजूनही ‘मला जगावसं वाटतंय आणि इतरांनाही जगवावसं वाटतंय’. संकल्प असा असावा की ‘ज्यायोगे आपल्याला इतरांची शारीरिक शक्ती, बौद्धिक शक्ती, मानसिक शक्ती वाढवायचा प्रयत्न करता येईल.’ हे झालं संकल्पाचं स्थूल रूप. आता हे स्थूलरूपाने जरी असलं तरी संकल्प हे शरीराला, मनाला लागू पडतात. शरीर हे वाढत नाही. आता शरीर हा शब्दच मुळी असा आहे की जे क्षीण होत जात असतं ते शरीर! शरीर क्षीण होत जाणारच पण त्या शरीराच्या आधाराने राहणारी मन- बुद्धी आणि उपजत मिळालेली ईश्वरी चेतना हे तीन घटक काही क्षीण होत नाहीत, उलट ते वाढू शकतात. संकल्प हे असे असावेत की ज्यांमुळे फक्त एकट्याचा नाही तर इतर अनेकांचाही विकास होईल!

या संस्कृतीच्या दीर्घकाळच्या प्रचंड ओघात जपून ठेवण्यासारख्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आणखी हजारो वर्षानंतर सुद्धा उपयोगाच्या होतील. आज तर आहेत, यापूर्वीदेखील होत्याच, नजीकच्या काळातदेखील उपयोगाच्या होतील.  त्या जपून ठेवाव्यात अशा महत्वाच्या गोष्टींमधली एक गोष्ट ही आहे की 'मला जगावंसं वाटतंय' ही प्रेरणा! सुदैवाने ती प्रेरणा माझ्यात आहे, कारण माझं जगणं हे कोणावर ओझं होतंय असं मला अजूनतरी जाणवत नाही. त्यामुळे इतरांनाही त्यांचं जगणं हे असं उपयोगाचं करता येईल अशी मदत करत राहणं मला जास्त महत्वाचं वाटतं. संकल्प हे त्यासाठीच असावेत.


विद्याव्रताची आम्हाला आठवण होते. दीक्षा ग्रहणाच्या वेळी आम्ही मोठेपणी अमुक तमुक होऊ असं ठरवलं होतं. काहींना ते जमलं तर काहींना नाही जमलं. नोकरी संसारात आता स्थिर झालोय तरी आवड म्हणून वा छंद म्हणून त्या स्वप्नांचा पुन्हा पाठलाग करता येईल का ?

हो. पुन्हा सुरुवात करता येईल. कदाचित त्यावेळी आपली बुद्धी कमी प्रगल्भ असल्यामुळे, जगाचा तितकासा अनुभव नसल्याने, इतिहासाची पुरेशी ओळख नसल्याने, भविष्याकडे कसं बघायचं हेही त्यावेळी नीट न समजल्याने कदाचित आता असं वाटू शकतं की 'अरे, मी त्यावेळी काहीतरी किरकोळ ठरवलं होतं, आता मात्र मी काहीतरी मोठं काम करू शकतो.' विद्याव्रताचा अर्थ एवढाच समजावा की 'असं काही स्वप्नं उराशी बाळगायचं असतं.’  ते स्वप्न म्हणा वा संकल्प म्हणा, तो आयुष्यभर पाळावा असं त्यावेळी ठरवलं असेल पण आता जमत नसेल तरी फार खंत बाळगू नये. प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं की आपण एकाचवेळी दहाही दिशांना चालू शकत नाही. कुठेतरी पोहोचायचं असेल तर कुठलीतरी नेमकी एक दिशा पकडावीच लागेल. त्यामुळे संकल्प करण्याचं महत्त्व काय असतं हे समजून ती दिशा शोधत राहणं महत्वाचं. दिशा मूर्त असो वा अमूर्त, ती जर माणसांना उपयोगाची असेल तर पकडावी. नवे संकल्प करावेत. नवे पराक्रम करावेत. त्यापायी जुने संकल्प जर सोडून द्यावेसे वाटले तर खुशाल सोडावेत. संकल्प शोधत राहून ते निभावण्याची सवय मात्र बुद्धीला कायम असावी.

 

भाऊ, तुम्ही आयुष्यभर एकाच रंगाचे कपडे घालता, आजकाल एकवेळच जेवता. नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे असा प्रकार समजावा का हा सगळा?

सुरुवातीपासूनच माझी अशी भूमिका आहे की 'आपल्या गरजा अत्यंत मर्यादित ठेवाव्यात. कमी वेळा आणि कमीत कमी जेवणं, जेवढं शरीर चालायला उपयोगाचं आहे तेवढंच जेवणं यावर माझा भर आहे. कारण खाल्लेलं अन्न हे केवळ आजच उपयोगी पडतं. आणखी पंधरा दिवसांनी ते उपयोगाला येईल अशी त्यात सोय नसते. आजच्या दिवसभरात मला काय करायचंय ते मला ठाऊक असतं, म्हणून मी त्याप्रमाणे आहार घेतो. माझ्या महाविद्यालयीन वयात तर मी सलग महिना महिना केवळ अर्धा लीटर दूध आणि सहा केळी खाऊन देखील राहिलोय, आणि उत्तम राहिलोय. त्यातून माझ्या लक्षात आलं की आवश्यकतेएवढाच आहार घ्यावा. गरजेहून जास्त आहाराची आणि अनेकविध पद्धतीच्या आहारप्रकारांची खरंतर काहीच गरज नसते शरीराला! शरीर उत्तम राहू शकतं. त्यामुळे आपल्या गरजा या कमीत कमी असाव्यात. जी आहाराची गोष्ट तीच कपड्यांचीही गोष्ट. आपल्या पारंपारिक विचारांमध्ये एक संकल्पना आहे की घडी घातलेले किंवा शिवलेले कपडे वापरू नयेत. बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की खरंच आपल्या जुन्या सर्व पोषाख पद्धती या अशा होत्या की त्यात न कापलेले, न जोडलेले असे कपडे असायचे. व्यवहारात काही वेळा हे चालतं काही वेळा चालत नाही. माझ्या मनात पूर्वी एक विचार आला होता की मी खुर्चीदेखील वापरू नये. मी मांडी घालून खाली भारतीय बैठकीवर बसावं आणि समोरच्यालाही बसायला सतरंजी अंथरावी. पण सध्याच्या काळात असं खाली बसण्याची तयारी अनेकांची नसते. कधी शारीरिक अथवा कधी मानसिक कारण असतं, सवयीचा भागही नसतो. त्यामुळे मी तो हट्ट केला नाही. माझी खुर्ची मात्र मी ही याच साध्या पद्धतीची ठेवणं पसंत करतो; अगदी केव्हापासून तर मी ज्ञानप्रबोधिनीत जेव्हा १९६९ साली कामास सुरुवात केली तेव्हापासून! इकडे तिकडे फिरणारी, खाली वर करता येणारी, आरामदायी खुर्ची मला कधीच गरजेची भासली नाही. आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा या कमीत कमी असाव्यात एवढंच भान मी ठेवलं. या त्या वस्तूंमुळे आणि आपणच वाढवून ठेवलेल्या गरजांमुळे आपलंच जगणं आपण अवघड करून ठेवतो. मला स्मरतंय त्यानुसार वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी हेच पळतोय. लोकांना माझं वागणं असह्य विचित्र वाटणार नाही एवढी काळजी मी नक्कीच आयुष्यभर घेतली. पण एकविसाव्या शतकातला रामदास व्हायला माझी हरकत कधीच नाही.

 

तुमची खुर्ची ही तुमच्यासाठी कदाचित केवळ वस्तू असेल पण आमच्यासाठी कायमच प्रेरणा ठरली. आजही आठवतं की या खुर्चीपाशी बोलावून तुम्ही जेव्हा खडीसाखर खायला द्यायचा किंवा शिक्षा म्हणून बोटात पेन घालून बोटं पिरगळायचा तेव्हा दिवस नक्कीच वेगळा जायचा. त्या शिक्षांमागे नेमका काय विचार असायचा हो ? आणि कुठून शोधून काढायचात तुम्ही या भन्नाट शिक्षा ?

त्या त्या वेळची ती गरज असते. साधारण १९६२ पासून ते १९९६- ९७ पर्यंत हे शिक्षाप्रकार मी वापरायचो. त्यानंतर नाही वापरले कधी ते. त्यानंतर मात्र माझं म्हणणं बदललं. ‘अरे बाबा तू नाही शिकलास तरी फार काही मोठं बिघडणार नाही. त्याशिवायही तू मोठा होऊ शकतोस. असं मला वाटू लागलं त्यामुळे मग मी विद्यार्थ्यांना शिक्षा करणं सोडून दिलं. ज्याला तहान लागते तो पाणी शोधतो आणि पाणी मिळवून पितो. शिक्षकाचं काम फार फार तर एवढंच असतं की ‘विद्यार्थ्याला तहान कशी लागेल, यासाठी प्रयत्न करत राहणं. जेवायला घालण्यात अनेकांना स्वतःचा मोठेपणा वाटतो पण मला त्याचं फार कौतुक नाही. मुलाला भूक कशी लागेल हेही पाहायला हवं ना. भूक लागल्यानंतर जेवायला समजा नाही मिळालं तर फार फार तर ते मूल चोरी करेल. चोरून खाल्लं तरी बिघडलं नाही पण भूक लागलीच नाही तर गडबड होईल. त्यामुळे माझ्या हातून कायम ती भूक डोक्यात ठेवून शिक्षा केल्या गेल्या. जेवू घालणं हे त्यापुढे कायमच दुय्यम होतं. शिक्षेचे ना मी कधी कुठले प्रकार ठरवले ना शिक्षेचा फार आग्रह धरला. बरेच प्रकार हे प्रासंगिक असायचे. म्हणजे एखादा मुलगा सुधारावा असं जर मला वाटलं तर मी त्या मुलाला सांगून एकेक दिवस स्वतः उपवास केलाय. तो सुधारण्यासाठी मी प्रायश्चित भोगलंय. मला हे कायमच स्पष्ट होतं की चोरी करणाऱ्याला माझ्या शाळेतून मी काढून टाकलं तर तो दुसऱ्या शाळेत जाऊन चोऱ्या करत सुटेल. त्याला साम दाम दंड भेद यापैकी कुठलही अस्त्र वापरून अखेर मला माणूस म्हणून सुधारायला हवं. मी कायम अशाच दिग्दर्शक शिक्षा केल्या.


एवढ्या बारकाईने विद्यार्थ्यांचा विचार तुम्ही केला, इथल्या सगळ्याच शिक्षकांनी केला. त्यामुळेच कदाचित आज अनेक माजी विद्यार्थी एका हाकेसरशी शाळेसाठी धावत येतात. दहावी झाली आणि शाळेशी संपर्कच नाही राहिला, परत गेलो तर परकं परकं वाटलं असं आमच्या बाबतीत होत नाही. बरेच माजी विद्यार्थी आता तुमच्या संपर्कात आहेत का ?

अगदी १९६२ सालापासून माझं विद्यार्थ्यांच्या घरी जाणं येणं होतं, तेही उभयपक्षी होतं. मी शेकडो नव्हे तर हजारो विद्यार्थ्यांच्या घरी गेलोय. आजही ते संपर्कात आहेत. आताशा कामानिमित त्यांचं येणं जास्त होतं किंवा काहीजण स्वतःहून येऊन भेटतात किंवा ख्यालीखुशाली कळवतात. या दोन तीन वर्षांत मला वाटू लागलंय की माझी ही मार्गदर्शकाची भूमिका देखील आता मी मर्यादित केली पाहिजे. त्यामुळे त्या संपर्कातला माझा सक्रिय सहभाग जरासा मंदावलाय हे मी कबूल करतो. विद्यार्थ्यांप्रती आकस मात्र नक्कीच नाही. उलट त्यांचा पुरेपूर अभिमान वाटतो. अगदी भारताचे सध्याचे लष्करप्रमुख मनोज नरवणे हे आपल्या शाळेत घडलेले आहेत, पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संस्थापक डॉक्टर धनंजय केळकर हेदेखील माझे विद्यार्थी आहेत. मोहनराव गुजराथी यांचादेखील अभिमान वाटतो. नवनगर विद्यालयाचे अगदी अलीकडील काही विद्यार्थी म्हणजे गुरुकुलचा मानस जोंधळे किंवा घरकुलचा सारंग उपासनी हे आज लष्करी सेवेत उत्तमरित्या कार्यरत आहेत, पदक मिळवण्या इतपत उत्तम कामगिरी त्यांनी केल्याचं समजतं तेव्हा मनापासून आनंद वाटतो. शेतीमध्ये काम करणारी प्रांजली बोरसे ही देखील मला समाजाला ‘पोषक काम’ करण्यास प्रेरणा देणाऱ्यांपैकी एक वाटते. लढाऊ लष्करी कामाएवढंच तिच्या या पोषक कामाचं मला महत्व वाटतं. जे भारताची भूमी सोडून निर्वाहासाठी परदेशी गेले त्यांची नावं आताशा मला फारशी आठवत नाहीत. पण तिथे राहून ते भारतासाठी उत्तम काम करतायत असं समजलं तर समाधान वाटतं. जे प्रसारमाध्यमांमध्ये काम करतायत त्यांच्याबाबतीतही माझ्या कानावर उत्तमच पडतंय, मिडीयाच्या नादी लागून बदनामीकारक ते काहीही करत सुटलेत असं घडलं नाही. समाजाला उपयोगी पडणाऱ्या मुलांचा मला कायमच जास्त आनंद वाटतो. मग ते मूल ज्ञान प्रबोधिनीत घडले वा बाहेर कुठे घडले हा मुद्दा गौण !

 

नुकतेच नवे शिक्षण धोरण जाहीर झाले. त्या नवीन शिक्षणपद्धतीविषयी काय सांगाल?

त्याविषयी जे काही वाचलंय त्यातून एवढं नक्की समजलंय की ‘नव्या शिक्षण धोरणात हेतूंपेक्षा व्यवस्थांचा विचार हा जास्त झालाय. म्हणजे शिक्षण चांगलं होण्यासाठी आजच्या व्यवस्थेतल्या ज्या काही उणीवा आहेत त्या उणीवा आता नव्या व्यवस्थेमधून कशा बदलता येतील याचा विचार या धोरणात नक्कीच अधिक केला आहे. शिक्षणाचा उद्देश बदललाय असं मात्र मला वाटत नाही. आणि मी पुन्हा पुन्हा विचार करून हेच म्हणेन की गुरुकुल शिक्षण पद्धती सुरु करताना शिक्षणाविषयी जो काही माझा पक्का विचार झाला होता तो अजूनही तसाच आहे, किंबहुना तोच शाश्वत आहे. शिक्षणाने एवढेच साधायला हवे की व्यक्ती म्हणून उत्तम माणूस घडवला पाहिजे आणि तो घडलेला माणूस पुन्हा समाजाच्या कामी आला पाहिजे. शाळेने केवळ बुद्धिमान आणि यशस्वी विद्यार्थी घडवले तर त्यात काय नवल!      सामान्यातल्या सामान्य मुलालाही देशासाठी पुढे आपलं स्वतःचं मूल घडवावसं वाटणं हा मी शिक्षणाचा खरा विजय मानतो. विनोबाजी, साने गुरुजी, महात्मा गांधीजी हे आपल्या आईमुळे घडले. त्यांच्या आया समाजात कुणाच्या डोळ्यात भरतील एवढ्या उंचीवर राहून काम करत नव्हत्या पण निदान आपलं अपत्य उत्तम घडवणं, समाजाच्या हितासाठी घडवणं हे अतिशय महत्वाचं काम या मातांनी केलं. त्यांचं काम देशाच्या वैभवात भर टाकणारं ठरलं. मुलगी ही उत्तम माता असली पाहिजे. ‘मी घरीच बसून आहे. मुलांमध्ये अडकले आहे. दोन पैसे कमवत नाही.’ असं आजच्या गृहिणींनी चुकूनही मनात आणू नये. भारताचं उद्याचं भवितव्य घडवण्याचं काम माझ्या शिरावर आहे असं समजून आपली मुलं उत्तम घडवावीत. कुणीतरी म्हटलंय की ‘तृणेन कार्यं भवतीश्वरानाम |’ एखाद्या गवताच्या काडीनेसुद्धा सामर्थ्यसंपन्न माणसाचं कार्य सफल होत असतं. त्यामुळे साधी गवताची काडी समजून तिला टाकून देऊ नये, जाळून टाकू नये, तिच्याकडे दुर्लक्ष तर अजिबात करू नये. प्रत्येकाने त्याचं त्याचं स्वतःचं काम समजून घेऊन केलं तरी देशघडणीमध्ये खूप मोलाची भर पडेल.

शाळेत जास्त गुण मिळवणारा विद्यार्थी आवडता आणि अभ्यासात तितकीशी गती नसलेला विद्यार्थी नावडता असं कोणी समजू नये. खोडकर मुलांसाठी कधीच माझ्या मनात राग नव्हता. उलट आज तीच खोडकर मुलं उत्तम प्रकारे काम करतायत असं जाणवतं.

 

स्पंदनच्या माध्यमातून सगळ्या माजी विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? माजी विद्यार्थ्यांचं संघटन व्हावं असं तुम्हाला वाटायचं. आज ते प्रत्यक्षात उतरतंय. स्नातकसंघटनाची तुमची नेमकी काय संकल्पना होती?

जेवढा काही इतिहास मला माहीत झालाय त्यातून मला कायम हेच जाणवतं की भारताएवढी संपत्ती, समृद्धी आणि वैभव जगाच्या पाठीवर इतर कुठल्याही देशात नाही, आजही नाही. याची पाळंमुळं आहेत ती भारतीय विचारप्रवाहात आणि जीवनप्रवाहात. ज्या पद्धतीने हे दोन्ही प्रवाह प्रारंभापासून वाढत आलेले आहेत ते पाहता आपण ते जपले पाहिजेत हे निश्चित. जे कार्यकर्ते अशा विचारांचं भान ठेवून काम करतायत ते  आपणा सर्वांसाठी मोठं आशास्थान आहेत. बाकी व्यक्तिगत आर्थिक समृद्धी किंवा पदोन्नती याने फार काही फरक पडत नाही. कारण त्या उन्नतीला वैयक्तिक मर्यादा असतात. आता मनोज नरवणे यांचं नाव मगाशी आलं म्हणून सांगतो, देशासाठी भरीव कामगिरी करण्याची आज त्यांना संधी आहे. त्यांच्या यशात त्याचं किंवा शाळेचं कर्तृत्व हेदेखील मी गौण मानतो. ते त्यांचं भोक्तृत्व आहे असं म्हणणं जास्त रास्त ठरेल.

              नशिबाचा भाग म्हणा वा विचारांची ताकद म्हणा आज ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या छताखाली अशा विधायक ऊर्जाप्रवाहांनी घडलेली मोठी युवापिढी 'स्पंदन'च्या माध्यमातून एकवटते आहे. उत्तम व्यक्ती उत्तम कुटुंब घडवते. उत्तम कुटुंबं निरोगी समाज घडवतो. निकोप समाज घडणं हे आज संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे एकाच मुशीतून घडलेल्या युवक-युवतींसाठी आता 'संघटना हेच सूत्र बनावे ' नाही का !

 

सध्या काय वाचन करता आणि अभ्यास काय चालू आहे ?

ज्या गोष्टींमुळे मला माझं स्वरूप समजेल असा अभ्यास मी करतो. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हा साधू संतांचा विचार आयुष्याला जोडून बघतो. पूर्वी कदाचित मला व्यक्तींचं केवळ कर्तृत्व महत्वाचं वाटायचं आता मी भोक्तृत्वही असतं हा मुद्दादेखील विचारात घेऊ लागलोय. आता कुणाचा राग येत नाही, पूर्वीही नसे येत तितकासा पण आता नक्की जाणवतं की त्यातला हट्ट संपलाय. फार कुणाची स्तुती करावीशी वाटत नाही. परमेश्वराने जसं प्रत्येकाला घडवलंय तसं तो जगतो. संत ग्रंथाचं वाचन चालू आहे आणि वेद ग्रंथांचं रुपांतर, वेदांवरचं भाष्य वाचण्याचा मी अधिकाधिक प्रयत्न करतो. कारण त्यातून मला मनुष्याच्या अस्तित्वाचा अधिकाधिक बोध होत जातो. मनुष्य जो काही आहे तो असा का आहे, नेमका कसा असायला हवा ते समजायला मदत होते.


भाऊ तुम्ही आज या वयातही एवढं मुद्देसूद बोलताय, त्यामुळे तुमची केवळ बुद्धीची प्रभा नाही तर शरीरस्वास्थ्यदेखील टिकून आहे हे जाणवतंय. अजूनही व्यायाम करता?

हो, तो तर प्रत्येकाने करायलाच हवा. मी न चुकता रोज सूर्यनमस्कार घालतो आणि प्राणायाम करतो. पण ते केवळ एवढ्याचमुळे घडतंय असं नाही. माझ्या आईने मला जवळपास तीन साडेतीन वर्षं अंगावर दूध पाजलं होतं. ती शक्ती दीर्घकाल टिकणारी असते. आईच्या दुधातून माणसाला जीवनभर निरोगी आयुष्य जगता येईल असं भरपूर पोषण मिळतं, वाणी स्वच्छ राहाते, बुद्धी नीट काम करते, उतारवयात देखील विस्मरण होत नाही. मी भाग्यवान आहे करण मला काहीही समजत नव्हतं त्या वयात माझ्या आईने एवढा दूरचा विचार करून कंटाळा न करता दूध पाजलं. आज मुली मोठमोठ्या पदावर काम करतात, कुणी कलाकार आहेत तर कोणी मोठ्या संशोधिका परंतु त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलाला पुरेसं दूध पाजावं आणि अनंत काळासाठी त्याच्यावर उपकार करावेत एवढं या प्रश्नाच्या निमित्ताने नक्की सुचवेन.

 

गप्पा मारण्यासारखं खूप काही होतं पण बाहेर भाऊंच्या मार्गदर्शनासाठी कोणीतरी केव्हाचं तिष्ठत उभं होतं. कोरोना गर्दीला भीती दाखवू शकला होता पण गर्दी थोपवून धरण्याएवढी त्याची पुण्याई नव्हतीच कधी ! 'स्पंदन' ला आशीर्वाद तर मिळाले होते. नमस्कार करून नव्या उमेदीने मी बाहेर पडले.

 

-          प्राजक्ता गव्हाणे


वरील मुलाखत ही ज्ञान प्रबोधिनीच्या ‘स्पंदन’ या मासिकासाठी घेतली आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राचे संस्थापक, भाऊ तथा वा. ना. अभ्यंकर या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाशी साधलेला हा संवाद. परवा विजयादशमीला ‘स्पंदन’ प्रकाशित झाले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे हे संवादपत्र होय. संपूर्ण ई-अंक सर्वांसाठी उपलब्ध आहे. ‘शाळा’ नावाचा खास कोपरा ज्या ज्या रसिकमनात राखीव आहे त्या त्या प्रत्येकासाठी खुला आहे हा अंक! वाचा, प्रतिक्रिया द्या! अंकात सुधारणा करण्यासाठी आम्हाला आपल्या बहुमूल्य सूचनांचा उपयोग नक्कीच होऊ शकतो.

Download ‘Spandan’ : https://drive.google.com/file/d/1wtYm9Fdgjqtu7mqRruZ6WfyM6FZrxQfY/view




शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

गांधीजी आणि Whatsapp वरची तीन माकडे

गांधीजींना कधी स्वप्नातदेखील वाटले नसेल की त्यांचे हे 🙈 माकड Whatsapp वर लाजण्यासाठी वापरले जाईल!

गांधी जयंतीच्या निमित्ताने माझ्या आठ ओळी शेअर करते.



फॉलोअर

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत...