काही कविता तुम्हाला
तोंडपाठ नाही कराव्या लागत. त्या जेव्हा पहिल्यांदा तुमच्यासमोर येतात तेव्हाच
तुमच्या मनात घट्ट रुतून बसतात. इंदिराबाईंची 'कुब्जा' मला तशीच
वाटते. कृष्णमहिमा राजा परीक्षिताला समजावताना शुकदेवांनी अवघा ग्रंथराज भागवत
सांगितला पण 'प्रत्येकाचा कृष्ण वेगळा' हे त्याचे सार इंदिराबाईंनी
केवळ बारा ओळीत 'कुब्जा' लिहून मांडले. कंसदासी
कुब्जा किंवा त्रिवक्रा ती म्हणे अत्यंत कुरूप होती पण श्रीकृष्णाने तिचा उद्धार
केला, तिचे अंग जे तीन ठिकाणी वाकडे होते ते शापमुक्त केले वगैरे कथा
पुराणांमधून प्रसिद्ध आहेतच. इंदिराबाईंनी सूत्र तेच कायम ठेवले पण संपूर्णपणे
स्वतःच्या कल्पनेतील कृष्णभक्तीत न्हाऊन निघालेली 'कुब्जा' उभी
केली. मराठी साहित्याच्या अत्यंत समृद्ध
काव्यदालनातील ही एक त्यांची अतिलोकप्रिय आणि सुंदर रचना.
आज मुद्दाम त्याविषयी एवढे
लिहितेय; कारण घडलं असं की परवा सकाळपासून ही कविता सहज ओठी आली आणि
गुणगुणताना माझ्या लक्षात आलं की आपण साधारण त्याच ओळी वेगळ्या शब्दांनी म्हणतोय.
जरा लक्ष देऊन पाहिलं तर त्यात अर्थही प्रकट झाला होता. एव्हाना समजलं होतं की आपण
केवळ निमित्त आहोत, कुणीतरी आपल्याला त्याची कहाणी या ओळींमधून
सांगतंय. मी निरीक्षण करत राहिले,
"अजून नाही जागा कान्हा
अजून नाही जागे गोकूळ
अशा अवेळी हृदयावरती
का नुपूरांची नाजूक रुणझुण ?"
कोणीतरी स्त्री आहे, जिला गोकुळातल्या म्हणजे
बाळ किंवा कुमार कृष्णाची ओढ लागली आहे एवढं समजलं. पुढे मी टीपत राहिले.
"सावळसुंदर बिंब केशरी
पहाटवारा घुमवी किणकिण
अर्ध्या वाटेवरुनी फिरावे
तिथेच ....नी ..... क्षण क्षण "
कृष्णाला भेटायला येणारी ही स्त्री गोकुळाबाहेरची आहे हे स्पष्ट
झाले. कोण असावी? मीरा ? रुख्मिणी की सत्यभामा काही समजेना. मी शांत बसले. जमेल तेवढे दुर्लक्ष केले कारण
एव्हाना मला समजून चुकले होते की मी कविश्रेष्ठ इंदिराबाईंच्या कवितेला हात
घातलाय. मी हात घातला असेच बाहेरून सगळ्यांना दिसत असेल पण मला टक्क जाणवत होते की
मी पुरती अडकलेय. सबंध दिवस सरत आला तरी पुढचं कडवं एक कोडं बनून उभं होतं. 'कुब्जा' मधील
सगळ्यात गोड ज्या दोन ओळी आहेत "विश्वचि अवघे ओठा लावुनी कुब्जा प्याली तो मुरलीरव..."
आता मला या ओळींवर प्रवास करायचा होता. काहीही केलं तरी माझ्या हाती काहीच नव्हतं.
"ती" जी कोणी होती ती जोवर समोर येत नाही तोवर मला तिची भूमिका मांडणं
शक्यच नव्हतं. शेवटी बसले निगुतीने laptop उघडून. कोरं पान उघडून
सकाळपासून 'तिने' मला दिलेल्या ओळी एकदाच्या नीट लिहून घेतल्या. दोन
कडवी टीपून झाली आणि तिसऱ्या कडव्यावर येऊन अडून बसणार तेवढ्यात झरझर 'तिने' मला
आख्खं कडवं दिलं,
" कृष्णचि अवघा जन्मा घालून
विश्वा दिधला देवकीनंदन
पान्ह्यामधुनी थेंब दुधाचे
'हे ज्याच्यास्तव... हे त्याच्यास्तव...!'
मी फक्त कृतज्ञतेने कृष्णमातेसमोर हात जोडले आणि वर पहिल्या कडव्याला
जाऊन "का ममतेची नाजूक पखरण" लिहिलं. आता मला भाव समजला होता. मीच का
तेही थोडंफार समजलं होतं. माझी मुलगी जी माझ्या अंगा खांद्यावर खेळत असते तिची 'देवकी' या
कोरोनाकाळात लेकराला भेटायला किती व्याकूळ होत असेल ते मला जाणवलं. इंदिराबाईंच्या
कवितेला हात लावलाय तर आता कुणाचा सल्ला बिल्ला घेऊ का वगैरे दडपण दूर झालं.
शब्द शांती देतात. शब्द नाती देतात. शब्द सत्य दाखवतात. सत्य अभय देतं. विचारांना गणगोत असतं. आपण फक्त अशी नाती निभावायची असतात एवढंच सांगू शकेन.
कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा!