मंगळवार, १० डिसेंबर, २०१९

पाहायलासुद्धा हिंमत लागेल असं नाटक : ''गॅम्बिट अँड द ग्रीफ्टर''


परवा ''गॅम्बिट अँड ग्रीफ्टर'' नावाचं प्रभाकर पवारांचं नाटक पाहिलं आणि सुन्न झाले. एरवी नाटक संपलं की आपण टाळ्या वाजवतो, भानावर येतो, कलाकार असतील ओळखीचे किंवा सुलभ तर लगेच त्यांना भेटून वगैरे त्यांचं कौतुक करतो. पैसा वसूल झाल्याच्या समाधानात कले बिलेचा विचार करत गाडीला किक मारतो. विकेंडच्या इतर राहिल्या साहिल्या कामांकडे आपसूक मोर्चा वळवतो. थोडक्यात नाटकाला घरी घेऊन येत नाही. या नाटकाच्या बाबतीत जरा वेगळं घडतंय. फुकटचा डोक्याला शॉर्ट झाला असा प्रकार तर अजिबात नाहीये उलट एक विचित्र बधीरी घेरून राहतेय या नाटकामुळे ! पुन्हा पुन्हा तुम्ही माणूस म्हणून तुमच्या आजुबाजूच्या माणसांना शांतीत निरखू लागता. जाणीवांना विलक्षण वेगाने दणका देणारं एक वेगळंच नाटक मराठी रंगभूमीवर दाखल झालंय हे नक्की.

कथा फिरते दोन मैत्रिणींभोवती. वरवर सोपं दिसणारं त्यांचं नातं विचित्र गुंत्यात अडकलंय हे सुरुवातीलाच समजतं. वेश्यावस्तीत लहानाचा मोठा झालेला रघू पोलिसांचा पिच्छा चुकवत निशाच्या घरी अपरात्री येऊन थडकतो. घरात घुसलेल्या पुरुषाला तेही अशा अनोळखी पुरुषाला एवढ्या रात्री नेमकं कसं सामोरं जावं ते उमजून निशा चांगलीच भांबावते. सुरुवातीला घाबरलेली निशा रघूच्या चांगुलपणामुळे त्याच्याकडे ओढली जाते की तिच्या सद्य आयुष्यातील कोंडीमुळे खेचली जाते ते पाहण्यातच मजा आहे. हे नातं फुलतंय फुलतंय तोवरच मुग्धा नामक जबरदस्त प्रभावी पात्र नाटकात प्रवेश करतं. मुग्धा पेशाने वकील आणि वागण्याबोलण्यात एवढी हुकुमी ठसक्याची की समोरचा सहजच  चिरडला जाईल. मग साध्या रघूची तिच्यापुढे काय कथा ! तरीदेखील निशाने हरप्रकारे एकान्त गाठून रघूपाशी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची तक्रार करण्याचा प्रयत्न चालवलाय. वकील मुग्धाला 'निशाच्या आयुष्यात आलेल्या पुरुषाचा ' सुगावा लागायला असा कितीसा वेळ लागणार ! रघूला निशाच्या आयुष्यातून कायमचं घालवून देण्यासाठी वेडीपिशी झालेली मुग्धा गोष्टीला कुठच्या कुठे नेऊन ठेवते.

आख्खी गोष्ट इथेच सांगून बसले तर ती नाटक पाहायला उत्सुक मंडळींशी प्रतारणा ठरेल. मला वेगळीच खदखद मांडायची आहे. अमृता ओंबळेने साकारलेलं वकील मुग्धाचं पात्र मला ही अस्वस्थता देऊन गेलंय. हे पात्र येतंच ते तुमचा मेंदू पोखरायला ! शर्ट इन केलेली, नीटस वकीली पेहरावातली मुग्धा येताक्षणीच तिच्या आवाजाने स्टेज खाऊन टाकते. झोपेतून उठणारी निशा सवयीने मुग्धाला जेव्हा मीठी मारते तोवर नाटकात सारं काही सुरळीत चालू असतं. पण त्यापुढे तितक्याच सहजपणे निशाच्या बटांशी खेळत मुग्धा जेव्हा हक्काने तिच्या चौकशा सुरु करते, निशाच्या फक्त आयुष्यावर नव्हे तर शरीरावरदेखील स्वतःचा हक्क सांगते तेव्हा नाटक तुम्हालाच प्रेक्षक म्हणून आव्हान देऊ लागतं. खरंतर आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेली वकील मुग्धा तिच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने कुणालाही सहज घायाळ करू शकते अशीच भासते पण एक परिपूर्ण स्त्री असूनदेखील तिला ओढ आहे ती निशासारख्या दुसऱ्या संवेदनशील मुलीचीच ! शब्दातीत चीड आहे पुरूष जातीची आणि तिच्या गत आठवणी तिला विश्वास ठेऊच देत नाहीत आता कुठल्याही पुरुषाच्या चारित्र्यावर ! बरं तिचं मिनिटा मिनिटाला विद्युतवेगाने चालणारं सुपीक डोकं पाहिलं तर ती कुठल्याही प्रकारची मनोरुग्ण वाटत नाही, नव्हे नाहीच ती. मग असं असताना तिला निशाविषयी वाटणारं आकर्षण आपण नैसर्गिक समजायचं? विकृती समजायची ? की आपल्या समाजाचा कोतेपणा?

दोन मुलींचं एकमेकींवरचं ओतप्रोत प्रेम आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकू ? नाटकाची चौकट सांभाळताना पात्रांचं जवळ येणं दिसायला खटकेल एवढंच साकारलंय पण तरीदेखील कथेची खोली, जाणीवांचा गाभा तुमच्यासमोर नाटकाचं वास्तव जसंच्या तसं घेऊन थयथया नाचतो. एरवी स्वतःला पुढारलेले वयोबद्ध प्रेक्षक म्हणवून बॉलिवूडपटातली आंबट दृश्य आपण जेवढ्या निवांतीत स्वीकारतो ना तेवढ्याच शांतपणे आपण दोन मुलींचं तरल नातं मराठी रंगभूमीवर आणि खरंतर त्या पल्याड आपल्या खऱ्या आयुष्यात पचवू शकतो का? कायद्याने वकील असणाऱ्या मुग्धाला महिलांविषयक नियमांचा विसर पडला असेल का ? निशाला सुरूवातीला गोड वाटणारे स्पर्श नंतर समाजाच्या भातुकलीपुढे टोचरे वाटून गेले का ? की परिस्थितीपुढे हतबल होऊन तिने ते गपगुमान सहन केलेत आणि म्हणूनच आता ती मुग्धाच्या मीठीत शिरते अगदी सहज ....मात्र शेवटपर्यँत निभावून न्यायची ताकद तिच्यात उरली नाही. " प्रोडक्शन नाही " म्हणून भावनांची गाठोडी जगण्याच्या गंगेत सोडून द्यायची असतात का? आणि स्त्री पुरूषांच्या मीलनातून जन्माला येणारी माणसाची पिल्लं तरी खरंच जगण्याला अर्थ द्यायला परत तेवढीच "प्रोडक्टीव्ह" असतात का ? मनाने एकमेकांच्या जवळ असणाऱ्या दोन व्यक्ती शरीराने आपसूक जवळ आल्या तर दरवेळी देशाच्या संविधानाची पानं फडफडवलीच गेली पाहिजेत का ? परवा परवा पर्यंत तर हा गुन्हादेखील होता म्हणे !

जर समाज मानतो तोच निसर्ग असेल तर मग जे आपल्याच समाजात दबून- लपून- छपून ठिकठिकाणी अस्तित्वात आहे त्याला काय निसर्गबाह्य म्हणायचं ? घुस्मटणाऱ्या माणसांचं निदान ऐकून तरी घेणार आहोत की नाही आपण ? शरीरापलीकडे खूप काही आहे या जगण्यात त्याचं भानच आपण विसरत चाललोय. माणसांना, नात्यांना जोड्या लावा- जोड्या जुळवा- रिकाम्या जागा भरात कोंबू पाहतोय. एकटं जगणारा तर "गजरे लावू कार्यक्रमांत" हजेरी लावण्याच्याही लायकीचा तुम्हाला वाटेनासा झालाय. अरे काय चाललंय काय? आयुष्य म्हणजे हळदी कुंकवाची, काजू बदामाची जोडी नाही. आयुष्य म्हणजे दुपारची वामकुक्षी आणि रात्री एसी बेडरूममध्ये सुरक्षीत घोरत पडणंही नाही. नाटकातला रघू जसा वेश्यावस्तीवरचं जीणं जगतो आणि स्वतःमधला पुरूष नावाचा प्राणी मारून अखेर माणूस बनायला लागतो तसा या शहरांत फुटपाथच्या वळचणीला जागोजागी दबल्या जखमा घेऊन जो माणसांचा ढिगारा पडलाय ना तो देखील आहे आपला समाज भले ते तुमच्यासारखा गजरा लावून वीकेंडला नित्यनेमाने खर्चिक तिकीट काढून नाटकांना हजेरी लावायची मदुर्मकी करत नसतील. परवडतही नाही त्यांना ते. पण जे कुठलं जीणं आलंय वाट्याला ते माणूसपणाने सांभाळत सक्षमपणे कडेला नेतायत ते

आय टी कंपनीत काम करणारी निशा साकारलीये ती प्रतिभा ठिकपुर्लेने तर वेश्यांच्या मुक्तीसाठी लढा देणाऱ्या रघूच्या भूमिकेत भेटतोय तो अभिनेता प्रतीक कडलक. सचिन बहिरगोंडे, शिवप्रसाद चॉगी यांचं कामही उत्तम पण सगळ्यात जास्त कौतुक करायला पाहिजे ते लेखक दिग्दर्शक प्रभाकर पवार यांचं ! असे विषय मांडले गेले पाहिजेत, तितक्याच ताकदीने त्याविषयी बोललं गेलं पाहिजे. माणसाला माणुसकीच्या कक्षा रुंदावायला भाग पडणाऱ्या अशा कलाकृती निर्माण झाल्या पाहिजेत. नुसतीच नाटकं करून दाखवणारे खूप असतात, प्रेक्षकांना आव्हान देणारी, पाहताना आमच्या जागेपणाची हिंमतीने मागणी करणारी धाडसी नाटकं सातत्याने भेटीस आली तर समाज म्हणून आपण समृद्ध होऊ.

येत्या २० आणि २२ डिसेंबरला या नाटकाचे "पैस रंगमंच" चिंचवड येथे दोन प्रयोग होणार आहेतचुकवू नये असा उद्योग आहे एकूणच. प्रेक्षक म्हणून स्वतःचा कस तपासून घ्यायला नक्की जा !

फॉलोअर

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत...