रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

मराठी बुक्ससाठी "एकदम बिनधास्त" खटाटोप

पुस्तकं ढापून वाचणारी एक पिढी होती. आता मराठी टिकवण्यासाठी ऑडिओ बुक्सचा खटाटोप करणारी माझी तरुण पिढी आहे. .मु.शिंदेंची "आई" कविता असो वा आण्णा भाऊ साठेंचं "स्मशानातलं सोनं" असो.... "गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या" किंवा "झेल्या", "पाखऱ्या ", "दमडी" असे लाखमोलाचे धडे असोत... सगळं  या पिढीचं तोंडपाठ असे. दरवर्षी बालभारतीचं पुस्तक मिळवून घाईघाईने त्याचा फडशा पडणारी ही पिढी आता रोज ऑफिसातून घरी आली की पोटच्या पोरांना "शिवाजी काँकरड दॅट फोर्ट " वगैरे शिकवत बसते आणि मनातल्या मनात अक्षरशः चरफडते. निदान आपला इतिहास तरी आपल्या भाषेतच शिकवावा असं काहीसं मनोमन डाचत असतं त्यांना पण मराठीची अक्षरओळखही उरलेल्या आपल्या नव्या पोरांना आता नेमकं कसं आणि कुठून काय काय एक्सप्लेन करायला घ्यावं हे काही सुधरत नसतं. पहिला उपाय सुचतो तो म्हणजे "चांगली मराठी पुस्तकं" आणून देऊयात. तशी ती दिलीही जातात पण नव्या पुस्तकांच्या वासाचं तिळमात्रही अप्रूप उरलेल्या आजच्या  स्मार्ट मुलांना ते पालक काही केल्या वाचनाची गोडी लावू शकत नाहीत. फार फार तर एक दोन फास्टर फेणे घरी येऊन पडतात आणि चष्म्याच्या भिंगातून परकेपणे त्या पोरांना न्याहाळत टीपॉयवर पडून रहातात

दुसरीकडे मराठी भाषा दिनाचं वगैरे औचित्य साधून व्हॉट्सअप - इन्स्टावर गरागरा पोस्ट फिरतात. आण -बाण -शान वगैरे मराठी फक्त कारच्या मागल्या काचांवर धूळ खात मिरवायलाच उरते आणि फुटपाथवर पायरेटेड कॉपीजच्या स्वरूपात का होईना पण परत परत "छावा", "मृत्युंजय",आणि "स्वामी" येऊन भेटत रहातात. जणू काही खांडेकर, शिवाजी सावंत वा रणजित देसाईंनी मक्ताच घेतलाय अविरत म्हणजे अगदी ओव्हरटाईम होईपर्यंत मराठी  पुस्तकं पुरवण्याचा! मला तर वाटतंय एक दिवस ते सगळे स्वर्गातून खाली येतील आणि फुटपाथवरूनसुद्धा त्यांची सगळी पुस्तकं गोळा करून घेऊन जातील; म्हणतील की इथून पुढे जोवर तुम्ही नवं काही कसदार लिहिणार नाही तोवर आमची पुस्तकं वाचायची तुमची लायकीच नाही! जागे व्हा, उठा आणि स्वतःचं नवं मराठी आकाश लिहितं करा. जे नवे मराठी लेखक येतायत ते दुर्दैवाने ढीगभर लाईक्समध्येच ढेकर देऊन तृप्त होताहेत. अखंड लेखन पुरविणारे ज्ञानयोगी अरुणाताई किंवा नेमाडेंसारखे विरळाच!

पुन्हा प्रश्न उरतोच. हमटी डमटी गाणारी नवी पिढी मराठीला एमटि तर करून सोडणार नाही ना? कुणी म्हणेल की मराठी एवढी गरीब बिचारी कधीच नाही.. नव्हती . "आपुल्या घरीच हाल सोसते मराठी ...शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!" ते सगळं मान्य पण मग कधी येणारे नेमकी ती फोडाफोडीची वेळ? आमच्या मुलांनी मोठं झाल्यावर मराठी टीव्ही चॅनेल्सचं उरलं सूरलं सबस्क्रिबशन देखील बंद करून घरातून मराठी एका क्लिकवर उखडून टाकल्यावर? की त्यांना त्यांच्या भाषेचा पूर्ण विसर पडल्यावर?

आज मी एवढी बडबड यासाठी करतेय कारण हे आणि असंच काहीसं सतत आत त्रास देत असतं. पण रोज रोज नुसता विचार करून जीवाला फुकटचा जाच करून घेण्यापेक्षा आजकाल संक्षिप्त उत्तरं शोधायचा प्रयत्न करतेय. गेले कित्त्येक महिने झाले, आपल्या मुलांसाठी मराठी ऑडिओबुक्स बनवतेय. सोप्या,खरंतर त्यांना आपल्याशा वाटणाऱ्या आणि तरीही मराठी टिकवणाऱ्या भाषेत ते मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्यांच्या हातात मराठीचं उद्याचं भविष्य आहे असा तरुण वर्ग किंवा किती दिवस तेच तेच वाचू, नवं काहीतरी दे असं म्हणणारा हौशी वाचक ही माझी ऑडिओबुक्स नक्की मनापासून ऐकू शकेल. आजच्या मुलांनां वाचनाची गोडी नाही यावर माझा विश्वास नाही. ताकदीचं लिहिणारा आणि मुलांना हव्या त्या शैलीत मांडणारा लेखक असेल तर मुलं पुस्तकांकडे नक्की वळतील हा माझा ठाम विश्वास आहे. मराठी पुस्तकांनी त्यासाठी मुलांच्या आवडत्या स्वरूपात प्रकट व्हायला पाहिजे. आज प्रत्येकाच्या धमन्यांमधून इंटरनेट वाहतंय. त्यामुळे मोबाईलवर सहज ऐकता येतील अशा गोष्टी आणि मोबाईलवर पानं उलटून अर्थासह शब्द समजावून सांगणारी पुस्तकं बनवण्यावर मी भर दिलाय

दोन कॉलेजवयीन मैत्रिणींच्या पुणे ते गोवा या बाईकप्रवासाची "एकदम बिनधास्त " कथा ऑडिओबुक मधून मांडली आहे. ती तुम्ही ऐकू शकता. रोहन शिंगाडेंसारख्या अनुभवी दिग्दर्शकाने या ऑडिओबुकवर मेहनत घेतली आहे. कथा सांगण्याची शैली नेमकी किती प्रकारे खुलवता येऊ शकते, साऊंड इफ्फेक्टसच्या जोरावर ऐकणाऱ्याला तुम्ही कसं पुरतं खिळवून ठेवू शकता हे त्यांनी ज्या प्रकारे हाताळलंय ते केवळ कौतुकास्पद! डाउनलोड करण्याची लिंक लेखाच्या शेवटी देत आहे

अमेझॉन किंडल वरून तुम्ही याच कथेचे ebook देखील वाचू शकता. अमेझॉन किंडल विषयी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जगातील सर्वात नावाजलेल्या या ईबुक रीडरवर जगभरातील केवळ ४१ भाषांमधील पुस्तके आहेत, त्यातील भाषा या भारताकडे आहेत आणि सर्वात अभिमानाची बाब म्हणजे त्या पाचपैकी एक भाषा आपली माय "मराठी" आहे! अमेझॉन किंडलने हे पुस्तक ऑक्टोबर पर्यंत मोफत उपलब्ध करून दिले आहे. जमलं तर नक्की वाचा. मराठी डिजिटल पायऱ्या चढू लागलीये तुम्ही आणि विशेष करून तुमची मुलं तिच्यासोबत पाऊल टाकायला तयार आहात का.... हा खरा सवाल आहे



फॉलोअर

वासोटा ट्रेक करताय..... जरा जपून !

शरीर फिरतं असलं की मन ताळ्यावर राहतं. शरीर एकाच जागेवर बांधून ठेवलं तर मन भटकू लागतं. आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल आणि पृथ्वीचा आनंद घेत...